नाशिकमध्ये भोंदूबाबाचा जादूटोण्याचा धाक; १४ वर्षे लैंगिक अत्याचार, ५० लाखांची फसवणूक
पोलीस महानगर नेटवर्क
नाशिक : “माझ्यासोबत संबंध ठेवले नाहीस तर तुझ्या घरातील कुणाचा तरी बळी जाईल”—अशी थरकाप उडवणारी धमकी देत नाशिकमधील एका भोंदूबाबाने एका विवाहित महिलेवर तब्बल १४ वर्षे लैंगिक अत्याचार केल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. जादूटोण्याचा आधार घेत पीडितेच्या कुटुंबियांची तब्बल ५० लाख रुपयांची फसवणूक केल्याचेही समोर आले आहे. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात भोंदूबाबा गणेश जगताप (रा. धारणगाव, ता. निफाड) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तो सध्या फरार आहे.
🔴 जादूटोण्याचा धाक दाखवत अत्याचार
तक्रारीनुसार, २०१० पासून आरोपीने पीडितेवर वारंवार लैंगिक अत्याचार केले. “तू मला आवडतेस, तुला मिळवण्यासाठी मी स्मशानात पूजा करतो” असे सांगत आरोपीने महिलेवर मानसिक दबाव आणला. त्याचबरोबर एका पुस्तकात पीडितेच्या पती व मुलांची नावे लिहून “संबंध ठेवलं नाहीस तर या नावांपैकी कुणाचा तरी बळी जाईल” असा जादूटोण्याचा धाकही दाखवला.
🔴 आर्थिक फसवणुकीचाही उलगडा
अत्याचारासोबतच आरोपीने पीडितेच्या कुटुंबीयांची विविध कारणांनी ५० लाखांची फसवणूक केल्याचेही तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी पोलिसांनी लैंगिक अत्याचार, फसवणूक आणि ॲट्रॉसिटीसह संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
🔴 गुन्हा दाखल होताच आरोपी फरार
तक्रार नोंदविण्यात आल्यानंतर लगेचच आरोपीला याची माहिती मिळाल्याचा संशय व्यक्त होत असून, त्याने तत्काळ पळ काढल्याची माहिती मिळते. आरोपीला कोण पाठीशी घालत आहे? पोलिसांत गुन्हा नोंदविला जाण्यापूर्वीच आरोपीला भनक कशी लागते? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, पोलिसांचे पथक फरार आरोपी गणेश जगतापच्या शोधासाठी रवाना झाले असून, त्याला तातडीने अटक करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.