मुंब्रामधील ‘छोटे बाबा’कडून तरुणीवर जादूटोण्याची भीती दाखवून लैंगिक अत्याचार
योगेश पांडे/ वार्ताहर
ठाणे – डोंबिवलीतील २९ वर्षीय योग प्रशिक्षक तरुणीवर मुंब्रामधील इम्रान सुभान शेख उर्फ ‘छोटे बाबा’ याने जादूटोण्याची भीती दाखवत सुमारे दोन वर्षे लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडितेच्या तक्रारीनुसार, योग वर्ग सुरू करण्यात मदत करण्याचे आमिष दाखवत आरोपीने तिला २०२२ मध्ये मुंब्र्यातील रिकाम्या घरात नेऊन अत्याचार केला. हा प्रकार बाहेर सांगितल्यास जादूटोणा करून कुटुंबीयांना संपवून टाकण्याची तसेच अश्लील दृश्यफिती उघड करण्याची धमकी आरोपी देत होता.
पीडिता हे सर्व इम्रानच्या कुटुंबीयांना सांगण्यासाठी गेली असता त्यांनीच तिच्यावर शिवीगाळ व मारहाण करून इम्रानसोबत लग्न करण्यास भाग पाडल्याचेही तिने सांगितले आहे. दरम्यान, इम्रानने तिला अकोला येथे नेऊन पुन्हा एकदा विवाह केल्याचेही तक्रारीत नमूद आहे. नंतर इम्रानचे हे तिसरे लग्न असल्याचे समजताच तो अधिक त्रास देऊ लागल्याने पीडिता अखेर पोलिसांकडे धावली.
रामनगर पोलिसांनी इम्रान शेखसह त्याचे नातेवाईक सगिरा शेख, सुभान शेख, हुसेना शेख व फक्रुद्दीन शेख यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेनुसार गुन्हा दाखल केला आहे.