प्रसिद्ध बिल्डरला ठार मारण्याची धमकी; शिवसेनेच्या माजी नगरसेवकाच्या मुलासह ७ जणांवर गुन्हा
योगेश पांडे/वार्ताहर
कल्याण – कल्याणमधील नामांकित विकासक मंगेश गायकर यांना बांधकाम साहित्य पुरवठ्याच्या कारणावरून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाच्या युवासेनेचे पदाधिकारी वैभव पाटील यांच्यासह सात जणांवर खडकपाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडवली येथील नवीन प्रकल्पांना साहित्य आमच्याकडूनच घ्यावे किंवा प्रत्येक गाडीमागे ३ हजार रुपये द्यावे, अशी मागणी आरोपींनी केल्याचा आरोप आहे.
आरोपी सकाळच्या वेळी हातात लाकडी दांडके घेऊन ‘मंगेश स्टार’, ‘मंगेशी हेवन’ आणि ‘जेमिनी’ प्रकल्पांच्या कार्यालयात घुसले. कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत बाहेर काढले आणि साहित्य पुरवठ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मागणी न मानल्यास जीवे मारण्याची धमकीही दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
दरम्यान, वैभव पाटील यांनी आरोप फेटाळून लावत, स्थानिक तरुणांना रोजगार मिळावा म्हणून चर्चा केली होती, कोणतीही खंडणी मागितली नसल्याचे स्पष्टीकरण दिले. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी ही कारवाई करवून घेतल्याचा आरोप त्यांनी केला आहे.