शेअर बाजारात उच्च नफ्याचे आमिष; नालासोपाऱ्यात ५१ वर्षीय नागरिकाची ८२ लाखांची फसवणूक

Spread the love

शेअर बाजारात उच्च नफ्याचे आमिष; नालासोपाऱ्यात ५१ वर्षीय नागरिकाची ८२ लाखांची फसवणूक

पोलीस महानगर नेटवर्क

विरार : शेअर बाजारातील गुंतवणुकीत अवास्तव नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून नालासोपारा येथील ५१ वर्षीय नागरिकाची तब्बल ८२ लाख ५० हजारांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उजेडात आली आहे. याप्रकरणी नालासोपारा पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार यांना ऑगस्ट महिन्यात अज्ञात व्यक्तीकडून एका गुंतवणूकविषयक व्हॉटसअ‍ॅप गटात जोडण्यात आले. या गटात सुमारे शंभर सदस्य गुंतवणुकीसंदर्भात चर्चा करत होते. काही दिवसांनी गटाच्या अॅडमिनने तक्रारदाराशी संपर्क साधत, शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल, असे सांगत त्यांना विश्वासात घेतले.

यानंतर एका लिंकद्वारे तक्रारदारास अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगण्यात आले. त्या अ‍ॅपमध्ये त्यांनी आपली वैयक्तिक आणि बँक खात्यांची माहिती भरल्यानंतर वेगवेगळ्या खात्यांमध्ये ८२ लाख ५० हजार रुपये भरले. अ‍ॅपवर वाढत्या नफ्याची आकडेवारी दिसत असल्याने त्यांनी अधिक गुंतवणूक सुरूच ठेवली.

नंतर त्यांना विविध आयपीओमध्ये गुंतवणुकीवर ३०० टक्के नफा मिळेल, असे सांगण्यात आले. मात्र, आधी गुंतवलेली रक्कम परत मिळवण्याची मागणी केली असता, त्यासाठी १० टक्के कर भरावा लागेल, असा खोटा विश्वास तक्रारदारास देण्यात आला. त्यांच्या कडे पूर्ण रक्कम नसल्याने किमान अर्धी रक्कम भरल्यास पैसे रिलीज होतील, असे सांगत आरोपी त्यांना पुन्हा पैसे भरण्यास प्रवृत्त करत होते.

यावर तक्रारदारास संशय आला आणि त्यांनी तत्काळ पोलिसांत धाव घेत तक्रार नोंदवली.

या प्रकरणी पोलिसांनी चार जणांविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३(५), ३३६(२), ३३६(३), ३४०(२) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६(क) व ६६(ड) अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon