आयपीएस अधिकाऱ्याच्या मुलीची आत्महत्या; नागपूर ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकलमध्ये घेत होती वैद्यकीय शिक्षण
योगेश पांडे / वार्ताहर
नागपूर – नागपूरच्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसची विद्यार्थिनी समृद्धी पांडे हिच्या आत्महत्येने खळबळ उडाली आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाचे डीआयजी कृष्णकांत पांडे यांच्या मुलीने आत्महत्या केल्याच्या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
समृद्धी पांडे ही नागपुरातील एम्समध्ये त्वचा रोग शाखेत वैद्यकीय शिक्षण घेत होती. बुधवारी सकाळी तिची मैत्रीण कॅालेजला गेली असता समृद्धीने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला. स्वतःच्या ओढणीने सिलिंग फॅनला घळफास घेऊन तिने आत्महत्या केली. समृद्धी त्वचारोग विभागात पदव्युत्तरच्या पहिल्या वर्षाची विद्यार्थिनी होती. समृद्धीने आत्महत्या का केली? याचा तपास सुरु पोलिसांनी सुरु केला आहे. नागपूरच्या सोनेगाव पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये नागपूरकडून याविषयी बोलण्यास नकार देण्यात आला आहे. मात्र हा विषय पोलिसांच्या तपासणी अंतर्गत असल्याने आम्ही काही बोलू शकणार नाही, असे एम्स नागपूरच्या एका उच्च पदस्थ सूत्राने सांगितले आहे. ते म्हणाले की एम्स नागपूरमध्ये आम्हा सर्वांनाच या घटनेने धक्का बसला आहे आणि दुःख झाले आहे. मात्र, सदर मुलगी एम्स नागपूर येथे येऊन फक्त दोन किंवा तीनच महिने झाले होते.
साधारणपणे विद्यार्थ्यांची आत्महत्या अकॅडमिक तणावामुळे होते, असे बोलले जाते. मात्र, या प्रश्नावर एम्सच्या सूत्रांनी सांगितले की त्वचा रोगाची (डर्माटोलॉजी) विद्यार्थिनी असल्याने तिला अकॅडमिक स्ट्रेस असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. डर्माटोलॉजीमध्ये फक्त ९ ते ५ काम असते. अन्य शाखांना असते त्यासारखे काम नसते. त्यामुळे, सायंकाळी किंवा रात्री थांबण्याचा किंवा वर्क रिलेटेड स्ट्रेस उद्भवण्याचा प्रश्नच नसतो.
एम्स नागपूर येथे विद्यार्थ्यांसाठी काऊन्सिलिंग नेहमी सुरू असते. तणावमुक्तीचे वर्कशॉप्स सुरू असतात, डीस्ट्रेसकरिता व्यवस्था आहे. त्यामुळे, आत्महत्याविषयी तपास पोलीस करणार असल्याने त्यांनाच याविषयी काही बोलण्याचा अधिकार आहे, असे एम्सच्या सूत्रांनी सांगितले.