पुण्यात नवले ब्रिजवर भीषण अपघात, ‘सेल्फी पॉईंट’ परिसरात ७ ठार, २० जखमी; वाहतूक वळविण्याचे पोलिसांचे आवाहन
सुधाकर नाडार / मुंबई

पुणे – पुणे-सातारा महामार्गावरील नवले ब्रिज परिसरातील प्रसिद्ध ‘सेल्फी पॉईंट’ येथे गुरुवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून २० हून अधिक जण जखमी झाले आहेत.
अपघातात एकूण आठ वाहने एकमेकांवर आदळली. त्यानंतर दोन वाहनांना अचानक भीषण आग लागल्याने काही क्षणांतच परिसरात अफरातफरी माजली. घटनेची माहिती मिळताच पुणे शहर पोलिस, अग्निशमन दल आणि आपत्कालीन सेवा पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली.
जखमींना जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. हा अपघात सिंहगड रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत झाला आहे.
उप पोलिस आयुक्त संभाजी कदम यांनी सांगितले की, “या अपघातात आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली असून, अनेकजण गंभीर जखमी आहेत. बचावकार्य सुरू असून घटनेचा तपास सुरु आहे.”
दरम्यान, वाहतूक पोलिसांनी नवले ब्रिज परिसरातील वाहतूक काही काळासाठी वळविण्यात आल्याचे सांगितले असून, नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
घटनेनंतर संपूर्ण परिसरात मोठी गर्दी झाल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस दल तैनात करण्यात आले आहे.