अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करत अंजली दमानियांचा गंभीर आरोप
पार्थ पवार भूखंड घोटाळा प्रकरणावरून उपमुख्यमंत्र्यांवर निशाणा
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई – पार्थ पवार भूखंड घोटाळा प्रकरणावरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तीव्र निशाणा साधत तात्काळ राजीनाम्याची मागणी केली आहे. सरकारी जमिनींमध्ये बनावट कागदपत्रांचा वापर करून गैरव्यवहार केल्याचा गंभीर आरोप करत दमानिया यांनी या प्रकरणात भारतीय दंड संहितेच्या कलम ४२०, ४६६, ४६८, ४७१, ४४१, ४४२, ४४७ आणि इतर संबंधित कलमांनुसार ७ ते १४ वर्षांपर्यंत शिक्षा आणि दंडाची तरतूद असल्याचे सांगितले.
दमानिया म्हणाल्या, “या प्रकरणात सरकारी अधिकाऱ्यांच्या संगनमताने सरकारी मालमत्तेचा गैरवापर झाला आहे. एवढे गंभीर आरोप असताना अजित पवार यांनी स्वतः चौकशीसाठी तयार राहून नैतिक जबाबदारी स्वीकारावी आणि तत्काळ राजीनामा द्यावा.”
दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सरकारने नेमलेल्या सहा सदस्यीय समितीच्या निष्पक्षतेवरही दमानिया यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “सहा पैकी पाच अधिकारी पुण्यातीलच आहेत. ते उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाची म्हणजेच पार्थ पवार यांची निष्पक्ष चौकशी कशी करतील?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
त्याचबरोबर, सामाजिक कार्यकर्त्या शीतल तेजवानी यांनी ३० डिसेंबर रोजी दिलेल्या पत्राचा उल्लेख करत दमानिया म्हणाल्या, “या प्रकरणात ‘अमिडिया कंपनी’ आणि एका पॉवर ऑफ अटर्नीद्वारे व्यवहार करण्यात आले, परंतु ही पॉवर ऑफ अटर्नी नोंदणीकृत नाही आणि विक्रीचे अधिकारही त्यात नाहीत, त्यामुळे संपूर्ण व्यवहार फसवणुकीचा आहे.”
दमानिया यांनी पुढे पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या भूमिकेवरही संशय व्यक्त करत, त्यांच्यावर तत्काळ निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली आहे. “सरकारी अधिकाऱ्यांनी जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न केल्यास या गैरव्यवहारातील साखळी अधिक बळकट होईल,” असे त्यांनी नमूद केले.
या सर्व घटनाक्रमामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून, विरोधकांकडूनही अजित पवारांच्या नैतिकतेवर प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे.