अंमली पदार्थविरोधी कक्षाची मोठी कामगिरी; गांजाच्या तस्करी प्रकरणातील आरोपींना १५ वर्षांची सक्तमजुरी आणि ₹१.५० लाखांचा दंड
सुधाकर नाडार / मुंबई
मुंबई – मुंबईतील अंमली पदार्थविरोधी कक्ष यांच्या दाखल प्रकरणात विशेष सत्र न्यायालयाने दोन गांजा तस्करांना १५ वर्षांची सक्तमजुरी आणि ₹१.५० लाख रुपयांचा दंड अशी कठोर शिक्षा सुनावली आहे. या निर्णयामुळे मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी मोहिमेला मोठे यश मिळाले आहे.
२३ जानेवारी २०२२ रोजी गुप्त माहितीच्या आधारे अंमली पदार्थविरोधी कक्ष, कांदिवली युनिटने घाटकोपर बस आगाराजवळ सापळा रचून दोन संशयितांना अटक केली. त्यामध्ये १) इस्माईल सलीम शेख (२१ वर्षे), २) इमरान अबरार हुसेन अन्सारी (४२ वर्षे) अशी नावे आहेत.
दोघांच्या होंडा अॅकॉर्ड (MH-02-OV-4878) या कारमधून ११५ किलो गांजा (अंदाजे किंमत ₹२८.७५ लाख) असा मोठा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी अं.प.वि. कक्ष, बांद्रा युनिटने गु.र.नं. ०६/२०२२ अंतर्गत एन.डी.पी.एस. अॅक्ट १९८५ चे कलम ८(क), २०(क), २७(अ) आणि २९ नुसार गुन्हा नोंदवून आरोपींना अटक केली.
तपासादरम्यान या तस्करीत सामील असलेले आणखी दोन साथीदार —
३) अल्ताफ मुल्का शेख (३८ वर्षे)
४) चक्रपाणी भल्लू गौडा (२६ वर्षे) — यांना गुजरात येथून अटक करण्यात आली.
स.पो.नि. संजय खंडागळे यांनी सखोल तपास करून वेळेत दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. यानंतर ११ नोव्हेंबर २०२५ रोजी विशेष सत्र न्यायालय (कोर्ट क्र. ४२) यांनी सादर केलेले पुरावे ग्राह्य धरून दोन्ही मुख्य आरोपींना १५ वर्षांची सक्तमजुरी आणि ₹१.५० लाखांचा दंड ठोठावला.
या प्रकरणाच्या न्यायालयीन कार्यवाहीत व.पो.नि. शशिकांत जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास व पैरवी करण्यात आली. प्रकरणात प्रभारी पोलीस निरीक्षक रुपेश नाईक, तपास अधिकारी स.पो.नि. संजय खंडागळे, फिर्यादी पो.ह.क्र. महेश चौधरी, तसेच कोर्ट पैरवी अधिकारी स.फौ.क्र. सिध्देश्वर पाटील, स.फौ.क्र. विल्फ्रेड मचाडो आणि पो.ह.क्र. भरत मोहिते यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
ही कारवाई पोलीस आयुक्त श्री. देवेन भारती, सह पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त (अंमली पदार्थविरोधी कक्ष) श्री. नवनाथ ढवळे, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. सुधीर हिरडेकर, आणि कांदिवली युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. मुंबई पोलीस दल अंमली पदार्थमुक्त समाज घडविण्याच्या ध्येयाने सातत्याने कार्यरत असून ही शिक्षा त्या प्रयत्नांना बळकटी देणारी ठरली आहे.