सांगलीत मुळशी पॅटर्न! दलित महासंघ अध्यक्ष उत्तम मोहिते यांची वाढदिवसाच्या पार्टीत निर्घृण हत्या; हल्लेखोराचाही मृत्यू
योगेश पांडे / वार्ताहर
सांगली – सांगली शहरात मंगळवारी रात्री गारपीर चौक परिसरात घडलेल्या दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. दलित महासंघाचे अध्यक्ष उत्तमराव मोहिते यांची त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमातच गुप्तीने सपासप वार करून हत्या करण्यात आली, तर हल्लेखोरांपैकी शाहरुख शेख उर्फ शब्या याचाही या झटापटीत मृत्यू झाला. या घटनेनंतर सांगली शहरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले असून गारपीर चौक परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री उत्तम मोहिते यांच्या वाढदिवसानिमित्त गारपीर चौकात मांडव टाकून भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अनेक मान्यवर आणि समर्थक उपस्थित असताना, शाहरुख शेख उर्फ शब्या हा आपल्या ८ ते १० साथीदारांसह कार्यक्रमस्थळी पोहोचला.
सुरुवातीला सर्वांनी जेवणाचा आस्वाद घेतला. त्यानंतर शुभेच्छा देण्याच्या बहाण्याने शाहरुख आणि त्याचे साथीदार मोहिते यांच्या जवळ गेले. त्याच क्षणी त्यांनी हाती घेतलेली धारदार शस्त्रे बाहेर काढत मोहिते यांच्या पोटावर आणि मानेवर सपासप वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्याने परिसरात खळबळ उडाली. गंभीर जखमी अवस्थेत मोहिते यांनी घराकडे धाव घेतली, मात्र हल्लेखोरांनी घरात घुसूनच त्यांच्यावर वार सुरू ठेवला. काही क्षणांतच मोहिते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले.
हत्येच्या घटनेनंतर संतप्त जमावाने शाहरुख शेखवर हल्ला चढवला. त्याचा पायावर घाव बसून प्रचंड रक्तस्राव झाला, तसेच जमावाने केलेल्या मारहाणीत त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला.
स्थानिक नागरिकांच्या मते, हल्लेखोर तरुण ड्रग्जच्या नशेत होते, आणि या नशेखोरीमुळेच शहरातील गुन्हेगारी वाढीस लागल्याचा आरोप करण्यात येत आहे.
सांगली शहर पोलिसांनी घटनेनंतर गारपीर चौक परिसरात मोठा बंदोबस्त उभारला असून काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नसले तरी पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे सांगलीत शोककळा पसरली असून, “मुळशी पॅटर्न”ची आठवण करून देणाऱ्या या हत्याकांडाने राजकीय वर्तुळात खळबळ माजवली आहे.