अजित पवारांचा मोठा निर्णय! रुपाली पाटील ठोंबरे आणि अमोल मिटकरींची प्रवक्तेपदावरुन सुट्टी; नव्या प्रवक्त्यांची यादी जाहीर
योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वादग्रस्त वक्तव्यं करुन स्वत:च्या पक्षाची कोंडी करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी आणि रुपाली ठोंबरे-पाटील यांची प्रवक्तेपदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. अमोल मिटकरी यांच्या वक्तव्यांमुळे महायुतीमध्ये सातत्याने तणाव निर्माण होताना दिसत होता. तर रुपाली पाटील ठोंबरे यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यावर तिखट आणि शेलक्या भाषेत टीका केली होती.
फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्याप्रकरणावरुन रुपाली ठोंबरे यांनी आपल्याच पक्षाच्या रुपाली चाकणकर यांना लक्ष्य केले होते. त्यामुळे रुपाली ठोंबरे पाटील यांना कारणे दाखवा नोटीसही पाठवण्यात आली होती. त्यानंतर रुपाली ठोंबरे पाटील यांनी अजित पवार यांचीही भेट घेतली होती. ही भेट होऊन काही तास उलटत नाही तोच रुपाली ठोंबरे पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्तेपदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. याशिवाय, वैशाली नागवडे आणि संजय तटकरे यांना देखील प्रवक्ते पदावरून हटवण्यात आले आहे. तर मध्यंतरी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्यामुळे पायउतार व्हावे लागलेल्या सुरज चव्हाण यांची पुन्हा एकदा प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
फलटण येथील डॉक्टर तरूणीच्या आत्महत्या प्रकरणांमध्ये चाकणकर यांनी तरुणीचं चारित्र्यहनन केलं असल्याचा आरोप करत रुपाली ठोंबरे यांनी चाकणकर यांच्यावर टीका केली होती. या दोन्हीही पक्षाच्या महिला नेत्यांमध्ये सुरू असलेल्या वादाची दखल राष्ट्रवादी पक्षाकडून घेण्यात आली होती. सदर प्रकरणाबाबत पक्षाचे संघटक सरचिटणीस संजय खोडके रूपाली ठोंबरे यांना ही नोटीस पाठवली होती. या नोटीसमध्ये आपणास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश प्रवक्ते पदाची जबाबदारी दिली असताना आपण राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष व पक्षाच्या महिलाध्यक्षा यांच्याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये केलेले वक्तव्य हे पक्षशिस्त भंग करणारे आहे, म्हणून आपल्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येऊ नये याचा ७ दिवसांत रुपाली पाटील ठोंबरेंना खुलासा करण्यास सांगितले होते. त्यानंतर आज पक्षाकडून रुपाली पाटील-ठोंबरे यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या प्रवक्तेपदावरुन काढून टाकण्यात आले आहे.
राष्ट्रवादीच्या नवीन प्रवक्तेपदावर १)अनिल पाटील २)रुपाली चाकणकर, ३)ब्रिजमोहन श्रीवास्तव, ४)चेतन तुपे, ५) आनंद परांजपे, ६)अविनाश आदिक, ७)सना मलिक, ८) राजलक्ष्मी भोसले, ९)सुरज चव्हाण, १०) हेमलता पाटील, ११) प्रतिभा शिंदे, १२)विकास पासलकर, १३) राजीव साबळे, १४) प्रशांत पवार,१५) श्याम सनेर, १६) सायली दळवी आणि १७) शशिकांत तरंगे यांची नियुक्ति करण्यात आली आहे.