‘जुडवा’ रिक्षांचा पर्दाफाश; कल्याणमध्ये एकाच नंबर प्लेटच्या दोन गाड्या धावत असल्याचा प्रकार उघड हरवलेल्या दागिन्यांचा शोध घेताना पोलिसांनी फोडला बोगस रिक्षांचा बनाव

Spread the love

‘जुडवा’ रिक्षांचा पर्दाफाश; कल्याणमध्ये एकाच नंबर प्लेटच्या दोन गाड्या धावत असल्याचा प्रकार उघड
हरवलेल्या दागिन्यांचा शोध घेताना पोलिसांनी फोडला बोगस रिक्षांचा बनाव

पोलीस महानगर नेटवर्क

कल्याण – हरवलेल्या दागिन्यांचा शोध घेताना कल्याण गुन्हे शाखेने एका अनोख्या फसवणुकीचा पर्दाफाश केला आहे. शहरात एकाच नंबर प्लेटच्या दोन रिक्षा धावत असल्याचे समोर आले असून, या प्रकरणात पोलिसांनी चालक जयेश गौतम याला अटक केली आहे.

कोकणातून आपल्या मुलींना दिवाळीचा फराळ देण्यासाठी आलेल्या महिलेने डोंबिवलीतील मुलीला भेटल्यानंतर कल्याण (पूर्व) येथील दुसऱ्या मुलीकडे जाण्यासाठी शेअर रिक्षा घेतली होती. टाटा पॉवरजवळ उतरल्यावर काही वेळातच तिला आपली दागिन्यांची बॅग रिक्षातच विसरल्याचे लक्षात आले. बॅगेत साडेतीन लाख रुपयांचे दागिने होते. घाबरलेल्या महिलेने तत्काळ आपल्या मुलीला माहिती दिली आणि तिने कल्याण गुन्हे शाखेकडे तक्रार नोंदवली.

तक्रारीनंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. फुटेजच्या आधारे रिक्षा शोधण्यात आली; मात्र बॅग हाती आली नाही. तपासादरम्यान पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली. महिलेने प्रवास केलेल्या रिक्षावर लावलेली नंबर प्लेट बोगस होती. एकाच क्रमांकाच्या दोन रिक्षा शहरात धावत असल्याचे समोर आले.

पोलिसांनी त्या रिक्षांवरील चलान रेकॉर्ड तपासले असता, एका चलानमध्ये संबंधित रिक्षाचा नंबर आणि चालकाचा मोबाईल नंबर सापडला. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी चालक जयेश गौतमचा ठावठिकाणा शोधून त्याला टिटवाळा परिसरातून अटक केली.

या कारवाईतून कल्याण पोलिसांनी बोगस रिक्षांच्या साखळीचा शोध लावला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon