सायबर गुन्हेगारांकडून नवनव्या फसवणुकीच्या युक्त्या; नागरिकांनी सतर्क राहावे : पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिन्त्रे यांचा इशारा

Spread the love

सायबर गुन्हेगारांकडून नवनव्या फसवणुकीच्या युक्त्या; नागरिकांनी सतर्क राहावे : पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिन्त्रे यांचा इशारा

रवि निषाद / मुंबई

मुंबई – सायबर गुन्हेगार नागरिकांची फसवणूक करण्यासाठी नवनव्या युक्त्या वापरत असून, नागरिकांनी अत्यंत सावध राहण्याचे आवाहन महाराष्ट्र सायबरचे पोलीस उपमहानिरीक्षक श्री. संजय शिन्त्रे यांनी केले आहे.

श्री. शिन्त्रे यांनी सांगितले की, व्हॉट्सॲप व टेलिग्रामच्या माध्यमातून “हाय रिटर्न” गुंतवणुकीचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक केली जात आहे. बनावट ट्रेडिंग अॅप्स किंवा क्रिप्टोकरन्सी स्कॅम्सद्वारे प्रारंभी नफा दाखवून नागरिकांकडून UPI किंवा बँक ट्रान्सफरद्वारे पैसे घेतले जातात. त्यानंतर संबंधित अॅप्स अचानक बंद होतात आणि गुंतवणूकदारांना मोठा तोटा सहन करावा लागतो.

याशिवाय काही सायबर गुन्हेगार स्वतःला पोलीस, CBI अधिकारी किंवा न्यायालयीन अधिकारी म्हणून सादर करतात. अशा कॉल किंवा व्हिडिओ कॉलद्वारे ते नागरिकांना सांगतात की, “तुमच्यावर गुन्हा दाखल आहे” आणि त्यातून सुटका मिळवण्यासाठी “सुरक्षित खात्यात” पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडतात. या प्रकारे नागरिकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असल्याचे त्यांनी सांगितले.

श्री. शिन्त्रे यांनी पुढे सांगितले की, बनावट FIR, कोर्ट ऑर्डर, पोलिस आयडी कार्ड तयार करून नागरिकांची दिशाभूल केली जाते. गुगलवरून हेल्पलाइन क्रमांक शोधणाऱ्यांना बनावट क्रमांक मिळवून स्क्रीन शेअरिंग अॅप्सद्वारे OTP व बँक तपशील घेतले जातात. काहीजण बोगस बँक हेल्पलाइन, ई-कॉमर्स सपोर्ट किंवा ट्रॅव्हल बुकिंग साइट्सच्या नावाखाली पेमेंट घेतात, परंतु वस्तू किंवा सेवा पुरवित नाहीत.

🔴 सावधगिरीचे उपाय:

केवळ अधिकृत व SEBI/RBI नोंदणीकृत गुंतवणूक प्लॅटफॉर्म वापरा.

OTP, पासवर्ड किंवा खाते तपशील कोणालाही देऊ नका.

वेबसाइट वापरताना “https://” आणि ग्राहक पुनरावलोकन तपासा.

मोबाईलमध्ये SIM लॉक, व्यवहार अलर्ट आणि अँटीव्हायरस सक्रिय ठेवा.

कोणत्याही अनोळखी लिंक, अॅप किंवा कॉलवर विश्वास ठेवू नका.

कोणतीही कायदेशीर नोटीस आली असल्यास ती स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये पडताळा.

सोशल मीडिया खात्यांवर दोन-स्तरीय सुरक्षा (2FA) वापरा.

सायबर फसवणूक झाल्यास सायबर हेल्पलाइन क्रमांक १९३० वर संपर्क साधावा किंवा cybercrime.gov.in या सरकारी पोर्टलवर त्वरित तक्रार नोंदवावी, असे आवाहन श्री. संजय शिन्त्रे (भापोसे), पोलीस उपमहानिरीक्षक, महाराष्ट्र सायबर, मुंबई यांनी केले आहे.

“सावध राहा, सुरक्षित राहा!” — महाराष्ट्र सायबर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon