गुजरात एटीएसकडून तीन आयसिस दहशतवाद्यांना अटक; देशात हल्ल्यांची योजना, शस्त्रे गोळा करण्यासाठी पोहोचले गुजरातला
योगेश पांडे / वार्ताहर
अहमदाबाद – गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अहमदाबाद येथील अडालज येथून दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या तीन जणांना अटक केली आहे. एटीएस पथक गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर लक्ष ठेवून होते. एका गुप्त माहितीनंतर, एटीएसने रविवारी सकाळी तिघांना अटक केली. तपासात तिघेही आयसिससाठी काम करत असल्याचे समोर आलं आहे.
एटीएसला माहिती मिळाली की दहशतवादी शस्त्रे गोळा करण्यासाठी गुजरातमध्ये येत आहेत आणि देशभरातील अनेक ठिकाणी हल्ले करण्याची योजना आखत आहेत. हे तिघे दहशतवादी दोन वेगवेगळ्या मॉड्यूलचा भाग आहेत. एटीएसच्या रडारवर असलेले दहशतवादी देशातील कोणत्या ठिकाणी हल्ला करण्याची योजना आखत आहेत हे शोधण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे.
यापूर्वी, गुजरात एटीएसने ऑगस्टमध्ये चार दहशतवाद्यांना अटक केली होती. त्यापैकी दोघांना गुजरातमध्ये, एका दिल्लीत आणि एका नोएडामध्ये अटक करण्यात आली होती. हे चौघेही बनावट चलन रॅकेटमध्ये आणि लोकांना दहशतवादी संघटनांशी जोडण्यात सहभागी होते. ते असे एप्स वापरत होते जे आपोआप कंटेंट डिलीट करतात. हे चौघेही अल कायदाशी संलग्न असलेल्या अल कायदा इन द इंडियन सबकॉन्टिनेंट साठी काम करत होते. ते सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि संशयास्पद एप्सद्वारे लोकांशी संवाद साधत होते.
एटीएसच्या मते, आरोपी २० ते २५ वर्षांच्या दरम्यान आहेत आणि ते भारतात दहशतवादी हल्ल्यांचा कट रचत होते. या दहशतवाद्यांना विशिष्ट आणि संवेदनशील ठिकाणांना लक्ष्य करण्याचे निर्देश देण्यात आले होते. हे चारही दहशतवादी सोशल मीडिया एप्सद्वारे एकमेकांशी जोडलेले होते. तपासात असेही समोर आले आहे की ते सीमेपलीकडे असलेल्या दहशतवाद्यांच्या संपर्कात होते. गुजरात एटीएस आणि केंद्रीय एजन्सी आता त्यांचे नेटवर्क, निधी, प्रशिक्षण आणि परदेशी संपर्क उलगडण्यासाठी काम करत आहेत. त्यांच्या चौकशीनंतर आणखी अटक होण्याची शक्यता आहे.