ओडिशातून अटक! एमडी ड्रग्ज प्रकरणातील सराईत आरोपी ‘अकबर खाऊ’वर अंमली पदार्थ विरोधी कक्षाची मोठी कारवाई
सुधाकर नाडार / मुंबई
मुंबई – अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या (एएनसी) घाटकोपर युनिटने मेफेड्रॉन (एम.डी.) विक्री प्रकरणातील पाहिजे आरोपी आणि सराईत गुन्हेगार अहमद मोहम्मद शफी शेख उर्फ अकबर खाऊ याला ओडिशा राज्यातून अटक करण्यात यश मिळवले आहे.
या प्रकरणात पोलिसांनी ६४ ग्रॅम एम.डी. (मेफेड्रॉन) जप्त केला होता, ज्याची बाजारभाव किंमत सुमारे ₹१२.८० लाख रुपये इतकी आहे. या प्रकरणातील दुसरा आरोपी फरीद रहेमतुल्ला शेख उर्फ फरीद चुहा याला याआधीच पोलिसांनी पकडले होते. त्याचा साथीदार अकबर खाऊ मात्र फरार होता.
तपासादरम्यान असे स्पष्ट झाले की, ठाण्यातील मोक्का गुन्ह्यातून जामीनावर सुटल्यावर अकबर खाऊ पुन्हा ड्रग्ज विक्रीच्या व्यवहारात सक्रिय झाला होता. त्यानेच अटक आरोपीस एम.डी. पुरवल्याचे निष्पन्न झाले.
गोपनीय माहितीच्या आधारे, वरिष्ठांच्या निर्देशानुसार घाटकोपर युनिटचे पथक ओडिशातील सुंदरगढ जिल्ह्यातील राजगंगपूर येथे रवाना झाले. तेथे पोलिसांनी शोधमोहीम राबवून १ नोव्हेंबर २०२५ रोजी रब्बानी चौकातून अकबर खाऊला अटक केली. त्यानंतर स्थानिक न्यायालयात हजर करून ट्रान्झिट रिमांड मिळवण्यात आला.
आज किल्ला न्यायालयाने आरोपी अकबर खाऊला ७ नोव्हेंबर २०२५ पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास घाटकोपर युनिटचे अधिकारी करत आहेत.
आत्तापर्यंत या गुन्ह्यात दोघांना अटक झाली असून, एकूण ६४ ग्रॅम एम.डी. (मेफेड्रॉन) जप्त करण्यात आले आहे.
अकबर खाऊचा गुन्हेगारी इतिहास:
या सराईत आरोपीवर १८ पेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. यात चोरी, मारहाण, मोक्का आणि एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्ह्यांचा समावेश असून, त्याच्याविरुद्ध कुर्ला, व्ही.बी. नगर आणि अंमली पदार्थ विरोधी कक्षात अनेक प्रकरणे नोंद आहेत.
ही यशस्वी कारवाई अंमली पदार्थ विरोधी कक्षाने पोलीस आयुक्त मा. श्री. देवेन भारती, सह पोलीस आयुक्त (गुन्हे) मा. श्री. लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) मा. श्री. शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उप आयुक्त (एएनसी) मा. श्री. नवनाथ ढवळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. सुधीर हिरडेकर यांच्या देखरेखीखाली केली.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल ढोले, पोलीस निरीक्षक भगवान बेले, पोलीस निरीक्षक दिगंबर पाटील आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.
मुंबई पोलिसांची ही कारवाई पुन्हा एकदा दाखवते की, शहरातील ड्रग्ज नेटवर्कविरुद्धची लढाई सातत्याने आणि प्रभावीपणे सुरू आहे.