छेडानगर परिसरात तृतीयपंथीयांचा दहशत; पोलिस प्रशासन मात्र मौन!
मुंबई – चेंबूरमधील छेडानगर परिसरात तृतीयपंथीयांकडून नागरिकांना लुटण्याच्या घटना वाढल्या असून, स्थानिक पोलीस मात्र या सर्व प्रकाराकडे दुर्लक्ष करत असल्याची नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मानखुर्द-घाटकोपर लिंक रोडवरील शाल्टपेन परिसरात संध्याकाळी तृतीयपंथीय गट रस्त्यावर उभे राहून जाणाऱ्या वाहनचालकांकडून पैसे उकळतात, विरोध केल्यास धमकावतात आणि लुटतात. बुधवारी रात्री सुमारे ८ वाजता तीन नागरिकांना लुटण्यात आले असून, या प्रकरणी अजून कोणतीही पोलिस कारवाई झालेली नाही.
स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे की, या परिसरात गेल्या काही महिन्यांपासून रेड लाईट झोनसारखे वातावरण निर्माण झाले आहे. येथे २० पेक्षा अधिक अवैध लॉजिंग बोर्डिंग हाऊसेस सुरू असून, त्यांपैकी केवळ दोन संगम आणि स्लोक यांनाच परवाने आहेत. उर्वरित लॉजिंग बेकायदेशीरपणे चालवले जात आहेत आणि त्यामध्ये देहव्यापार सुरू असल्याचे उघड झाले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, मुंब्रा आणि ट्रांबे परिसरातील महिलांना येथे आणून ग्राहकांना पुरवले जाते. काही लॉजिंग चालक स्वतःच दलालांची भूमिका बजावून कॉलगर्ल्सची व्यवस्था करून देतात. यामध्ये काही स्थानिक अधिकारी व पोलिस कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
स्थानिक नागरिकांनी याबाबत अनेक वेळा पोलिसांकडे तक्रार केली असली, तरी कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. या निष्क्रियतेमुळे पोलीस प्रशासनावरील संशय आणखी गडद झाला आहे. सूत्रांचे म्हणणे आहे की, दिवाकर प्रजापती नावाच्या लॉजिंग माफियाकडे ‘समृद्धी लॉजिंग’चा कारभार गेल्यानंतर या परिसरात अवैध धंद्यांना जोर आला आहे.
असेही आरोप आहेत की, सदर माफिया पोलिसांकडील काही अधिकाऱ्यांना ‘हफ्ता’ स्वरूपात मोठी रक्कम पोहोचवतो, त्यामुळेच संपूर्ण यंत्रणा या बेकायदेशीर कामांकडे डोळेझाक करत आहे.
या वाढत्या बेकायदेशीर व्यवहारांमुळे छेडानगर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, “पोलिसांनी तातडीने कारवाई करावी, अन्यथा आम्ही आंदोलनाचा मार्ग अवलंबू,” असा इशारा स्थानिकांनी दिला आहे.
छेडानगर परिसरातील वाढता अवैध व्यवसाय आणि तृतीयपंथीयांकडून होत असलेल्या लुटमारीमुळे रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा अधोरेखित झाला आहे.
मुंबई पोलिस प्रशासनाने याबाबत तातडीने लक्ष घालून कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.