मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व मुंबईकरांना समान हक्क द्यावेत – विलास रूपवते यांची मागणी
रवि निषाद / मुंबई
मुंबई – माता रमाबाई आंबेडकर नगर, कामराज नगर तसेच संपूर्ण मुंबईतील झोपडपट्टी भागातील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर देण्यात यावे, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे राज्य संघटक श्री. विलासभाऊ रूपवते यांनी केली आहे.
धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी धारावीतील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर देण्याची घोषणा केली. मात्र, अशीच सवलत आणि सुविधा इतर स्लम भागातील रहिवाशांनाही मिळाली पाहिजे, असे रूपवते यांनी स्पष्ट केले.
अलीकडेच घाटकोपर येथील माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर या पुनर्विकास प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडले. या वेळी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माता रमाबाई आंबेडकर आणि कष्टकरी कामगारांविषयी आदर व्यक्त केला.
मात्र, जर सरकारला खरंच कष्टकरी आणि मागासवर्गीय समाजाविषयी प्रेम असेल, तर धारावीप्रमाणेच माता रमाबाई आंबेडकर नगर, कामराज नगर आणि इतर झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांनाही ५०० चौरस फुटांचे घर देण्यात यावे, अशी मागणी रूपवते यांनी केली आहे.
महायुती सरकार केवळ उद्योजकांच्या फायद्यासाठी काम करत आहे, असा आरोप करत त्यांनी म्हटलं की, “जर सरकारने सर्व मुंबईकरांना समान हक्क दिला नाही, तर येणाऱ्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत माता रमाबाई आंबेडकर नगर, कामराज नगर तसेच संपूर्ण मुंबईकर जनता महायुती सरकारला योग्य उत्तर देईल.”
रूपवते यांनी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांच्याकडे समान हक्क देण्याची औपचारिक मागणी सादर केली आहे.