अखेर उल्हासनगर पोलिस ठाण्यात अमित बघेलविरुद्ध गुन्हा दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
उल्हासनगर : सिंधी समाजाचे आराध्य देव भगवान श्री झूलेलाल यांच्याबद्दल समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या छत्तीसगडमधील के.एस.जे.पी. पक्षाचे नेते अमित बघेल याच्याविरोधात अखेर उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वक्तव्यामुळे उल्हासनगरातील सिंधी समाजामध्ये तीव्र संतापाची लाट उसळली होती.
या प्रकरणी उल्हासनगर शहरातील काँग्रेस डॉक्टर्स सेलचे अध्यक्ष डॉ. हितेश सेचवानी यांनी दिलेल्या तक्रारीनंतर परिमंडळ ४ चे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांच्या आदेशानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
अमित बघेल यांनी समाजमाध्यमांवर सिंधी समाज व त्यांच्या आराध्य देवतेबाबत केलेल्या अपमानास्पद वक्तव्यामुळे सिंधी भाषिक नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या. या घटनेचा निषेध करण्यासाठी राजू जग्यासी फ्रेंड सर्कल, झुलेलाल मंडळी, चेटीचंद महायात्रा समिती यांच्यासह विविध संघटनांनी संतप्त प्रतिक्रिया नोंदवली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष भारत गंगोत्री, भाजप जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया, आमदार कुमार आयलानी, सुलभा गायकवाड आदींच्या शिष्टमंडळाने पोलिस उपायुक्त सचिन गोरे यांची भेट घेऊन कठोर कारवाईची मागणी केली.
सिंधी समाजाच्या प्रतिनिधींनी इशारा दिला होता की, जर तात्काळ कारवाई झाली नाही तर उल्हासनगर बंद आंदोलनाचा निर्णय घेतला जाईल. परिस्थितीचा गंभीर विचार करून डीसीपी सचिन गोरे यांनी तत्काळ कारवाईचे आदेश दिले असून, त्यानुसार उल्हासनगर पोलिस ठाण्यात अमित बघेल विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिंधी समाजाने प्रशासनाच्या या तत्पर कारवाईचे स्वागत केले असून, समाजाच्या धार्मिक भावनांचा आदर राखल्याबद्दल पोलिसांचे आभार मानले आहेत.