डोंबिवली उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; गोव्याहून येणाऱ्या विदेशी मद्याची ₹१.३१ कोटींची वाहतूक उधळली
सुधाकर नाडार / मुंबई
ठाणे – राज्य उत्पादन शुल्क, डोंबिवली विभागाच्या पथकाने गोवा राज्यात निर्मित भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याच्या अवैध वाहतुकीवर मोठी कारवाई करत तब्बल ₹१.३१ कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई ४ नोव्हेंबर रोजी सकाळी सुमारे ९:३० वाजता पनवेल–मुंब्रा रोडवरील उत्तरशीव येथे करण्यात आली. गुप्त माहितीनुसार आयशर कंपनीचा चॉकलेटी रंगाचा टेम्पो (क्रमांक MH-20-GC-6450) थांबवून तपासला असता, त्यामध्ये गोवा निर्मित विदेशी मद्याचे एकूण १,००० बॉक्स आढळून आले.
टेम्पो चालक मोहम्मद समशाद सलमानी आणि देवेंद्र खुमाराम मेघवाल या दोघांना तात्काळ अटक करण्यात आली. जप्त केलेल्या मालाची एकूण किंमत ₹१,३१,५२,००० इतकी असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
ही कारवाई उत्पादन शुल्क निरीक्षक डी.बी. काळेल यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी पी.यू. निकाळजे, ए.एस. वडक्ते, अ.गो. सराफ, आर.एन. आडे तसेच जवान आर.बी. खेमनर, व्ही.एस. अहिरे आणि महिला जवान ए.जे. नगरकर यांनी संयुक्तपणे केली.
प्रकरणाचा पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रविण तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.