दुबईहून भारतात आणला ‘शेरा’; आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्करी जाळ्याचा प्रमुख अखेर जाळ्यात
सुधाकर नाडार / मुंबई
मुंबई – परदेशातून भारतात अंमली पदार्थांचा मोठा व्यवसाय चालवणारा आणि ‘ड्रग्स नेटवर्क’चा प्रमुख सूत्रधार म्हणून ओळखला जाणारा सलमान सलीम शेख उर्फ शेरा अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. दुबईतून भारतात ड्रग्सचे कारखाने आणि वितरणाचे जाळे चालवणाऱ्या या फरार आरोपीला रेड कॉर्नर नोटीस जारी केल्यानंतर संयुक्त अरब अमिराती पोलिसांनी अटक केली होती. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्याला भारतामध्ये हस्तांतरित करण्यात आले असून, सध्या तो मुंबई पोलिसांच्या ताब्यात आहे.
अंमली पदार्थ विरोधी कक्ष (घाटकोपर युनिट) यांनी २०२२ साली मुंबई सेंट्रल परिसरात केलेल्या कारवाईत ९९५ ग्रॅम एम.डी. मेफेड्रॉन आणि ₹१.२५ लाख रोख रक्कम जप्त करण्यात आली होती. या प्रकरणाचा धागा पुढे शेरा पर्यंत पोहोचला आणि त्यानंतर या मोठ्या ड्रग्स सिंडिकेटचा पर्दाफाश झाला.
शेरा विरोधात महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत —
१. कक्ष-६, गुन्हे शाखा, मुंबई (गु.र.क्र. ५६/२०२३) — ₹७२.६२ लाख किंमतीचे एम.डी., केटामाईन आणि चरस जप्त.
२. बार्शी टाकळी पोलीस ठाणे, आकोला (गु.र.क्र. ५३२/२०२४) — ड्रग्स निर्मितीच्या कारखान्यातून ₹१.३८ कोटींचा इपिडाईन जप्त.
३. बीबीनगर पोलीस ठाणे, तेलंगणा (गु.र.क्र. ३७५/२०२४) — ₹२३ कोटींचा एम.डी. आणि अल्फाझोलम जप्त.
४. साकिनाका पोलीस ठाणे, मुंबई (गु.र.क्र. ९७/२०२५) — म्हैसूर येथील कारखान्यातून तब्बल ₹४६ कोटींचा एम.डी. हस्तगत.
याशिवाय डोंगरी पोलीस ठाण्यात (गु.र.क्र. २२७/२०१५) शेरावर आधीच एन.डी.पी.एस. कायद्यानुसार गुन्हा दाखल असून, त्यावेळी ₹९.४० लाख किंमतीचा एम.डी. पदार्थ जप्त करण्यात आला होता.
शेरा हा मुंबई, महाराष्ट्र, दक्षिण भारत तसेच परदेशातील अंमली पदार्थ वितरण जाळ्याचा मुख्य सूत्रधार असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. दुबईत बसून तो भारतातील कारखाने, पुरवठा साखळी आणि व्यवहारांचे नियंत्रण करत होता.
त्यास दिनांक ०२ नोव्हेंबर २०२५ रोजी अटक करण्यात आली. ही धडाकेबाज कामगिरी पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सहआयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलीस उपआयुक्त (अंमली पदार्थ विरोधी कक्ष) नवनाथ ढवळे, तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर हिरडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल ढोले, स.पो.नि. राघवेंद्र लोंढे आणि घाटकोपर युनिटच्या पथकाने केली.
सध्या आरोपी शेरा याला पोलिसांच्या ताब्यात ठेवण्यात आले असून, गुन्हे शाखेकडून पुढील तपास सुरू आहे. या अटकेमुळे मुंबई आणि राज्यातील अंमली पदार्थांच्या नेटवर्कला मोठा धक्का बसला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.