‘सत्याचा मोर्चा’च्या आयोजकांवर कारवाईचा बडगा; बेकायदेशीर सभा आणि पोलिस आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई : निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीविरोधात महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) एकत्र येत काढलेल्या ‘सत्याचा मोर्चा’मुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मात्र या मोर्चाला पोलिसांची परवानगी नसतानाही रॅली काढल्याप्रकरणी आयोजकांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. बेकायदेशीर सभा घेणे आणि पोलिस आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधित आयोजकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या मोर्चात मविआचे प्रमुख नेते उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे सहभागी झाले होते. या तिघांनीही निवडणूक आयोगावर दुबार मतदारांची नोंद ठेवत पारदर्शक निवडणूक प्रक्रियेला तडा देत असल्याचा गंभीर आरोप केला. राज ठाकरे यांनी या प्रसंगी दुबार मतदारांचे पुरावे सादर करत आगामी निवडणुका एक वर्ष पुढे ढकलण्याची मागणी केली.
दरम्यान, भाजपने या मोर्चाला उत्तर म्हणून ‘मूक आंदोलन’ केलं आणि विरोधकांच्या आरोपांना ‘फेक नॅरेटिव्ह’ असे संबोधले. “जिंकलो की लोकशाही आणि हरलो की मतचोरी — हीच विरोधकांची भूमिका आहे,” असा थेट आरोप भाजपकडून करण्यात आला.
‘सत्याचा मोर्चा’ला शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीतील अनेक वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती लाभली होती. मात्र पोलिसांनी पूर्वपरवानगी नाकारल्याने या मोर्चाची कायदेशीर अडचण वाढली. यापूर्वी मराठा आंदोलनावेळी सर्वसामान्यांना झालेल्या गैरसोयीचा आणि उच्च न्यायालयाच्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांचा दाखला देत पोलिसांनी या मोर्चाला हिरवा कंदील दिला नव्हता.
अखेर परवानगी न घेता मोर्चा काढण्यात आल्याने पोलिसांनी आयोजकांविरोधात गुन्हा दाखल करत कारवाईचा बडगा उगारला आहे. या घटनाक्रमानंतर महाराष्ट्राचे राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत.