महाडमध्ये राजकीय राडा : मनसे शहरप्रमुखाला दुकानात घुसून मारहाण; मंत्री भरत गोगावले यांच्या समर्थकांवर गुन्हा दाखल

Spread the love

महाडमध्ये राजकीय राडा : मनसे शहरप्रमुखाला दुकानात घुसून मारहाण; मंत्री भरत गोगावले यांच्या समर्थकांवर गुन्हा दाखल

पोलीस महानगर नेटवर्क

महाड (रायगड) : आगामी स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाड शहरात राजकीय वातावरण तापले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) शहरप्रमुख पंकज उमासरे यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी आता शिंदे गटाच्या आठ कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींमध्ये माजी सभापती सपना मालुसरे यांच्यासह इतर कार्यकर्त्यांचा समावेश असून, पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

दोन दिवसांपूर्वी पंकज उमासरे यांनी शिवसेना नेते व मंत्री भरत गोगावले यांच्या विरोधात टीका करताना “गद्दार शिवसेनेचं भवितव्य लोकल निवडणुकांमध्ये दिसेल,” असा इशारा दिला होता. या वक्तव्याचा राग मनात धरून शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी महाड येथील चवदार तळे परिसरातील त्यांच्या दुकानात घुसून त्यांच्यावर लाथाबुक्क्यांनी हल्ला केला, अशी तक्रार आहे.

या हल्ल्यानंतर गंभीर जखमी अवस्थेत उमासरे यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला. प्राथमिक चौकशीनंतर पोलिसांनी सपना मालुसरे, रोहन धेडवाल, प्रशांत शेलार, धनंजय मालुसरे, सौजन्य कानेकर, भावड्या सुर्वे, निरज खेडेकर आणि सुनंदा पवार या आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणाचा तपास महाड शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रमेश तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक खाडे हे करीत आहेत.

दरम्यान, अलीकडेच खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांना मनसेतून हाकलण्यात आले होते. त्यानंतर हे पदाधिकारी विविध पक्षांमध्ये प्रवेशले. मंत्री भरत गोगावले यांनी या पार्श्वभूमीवर “कोकणात मनसेचं अस्तित्व संपलं आहे,” अशी टीका केली होती. यावर उमासरे यांनी पलटवार करत “महाड नगरपालिकेत तुमचे दोन नगरसेवक का पडले, हे आधी बघा,” असे म्हणत शिंदे गटावर निशाणा साधला होता.

या आरोप-प्रत्यारोपांच्या मालिकेतूनच हल्ल्याची पार्श्वभूमी तयार झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या घटनेनंतर महाड शहरात एकच खळबळ उडाली असून, स्थानिक निवडणुकांच्या तोंडावर शिंदे गटाच्या अडचणी वाढल्याची चर्चा सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon