महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या हालचाली घडण्याचे संकेत; उद्याच्या मोर्चानंतर निवडणूक आयोगाच्या विरोधात कोर्टात जाण्याची रणनीती

Spread the love

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या हालचाली घडण्याचे संकेत; उद्याच्या मोर्चानंतर निवडणूक आयोगाच्या विरोधात कोर्टात जाण्याची रणनीती

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – मनसे आणि महाविकास आघाडीच्या पक्षांचा उद्या निवडणूक आयोगाच्या विरोधात मुंबईत भव्य मोर्चा निघणार आहे. मतदार याद्यांमधील घोळ दुरुस्त करुनच निवडणुका घ्या, अशी मागणी महाविकास आघाडीसह मनसेच्या नेत्यांची आहे. विशेष म्हणजे निवडणूक आयोगाने याबाबत कोणतही सकारात्मक पाऊल उचललं नाही तर मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. दोन्ही पक्षाचे नेते निवडणूक आयोगाच्या विरोधात कोर्टात याचिका दाखल करण्याच्या तयारीत आहेत. मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते पुढच्या दोन दिवसांत कोर्टात याचिका दाखल करण्याबाबत महत्त्वाचा निर्णय घेणार असल्याची माहिती समोर येत आहेत.सूत्रांच्या हवाल्याने याबाबतचं वृत्त दिलं आहे. दोन्ही पक्षांचे नेते ज्येष्ठ विधितज्ज्ञांची मते जाणून घेत आहेत. त्यानंतर याबाबत योग्य निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती आहे.

मनसे नेते आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांची काल मुंबईत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत १ तारखेच्या मोर्चाबाबत चर्चा करण्यात आली. या मोर्चानंतरही निवडणूक आयोगाने योग्य पावलं उचलली नाहीत किंवा आपल्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर काय करायचं? असा देखील विचार विनिमय या चर्चेत झाला. यावेळी तीन पर्यायांचा विचार करण्यात आला. पहिला पर्याय हा निवडणुकांवर बहिष्कार टाकता येईल का? असा विचार करण्यात आला. पण असा निर्णय घेतल्यास सत्ताधारी पक्षांचा फायदा होईल. त्यावर अपेक्षित अशी कारवाई होणार नाही, अशी चर्चा झाली.

यानंतर निवडणूक आयोगाविरोधात रस्त्यावर लढाई लढायची का? या मुद्द्यावरही चर्चा झाली. पण रस्त्यावर लढाई केली तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी चर्चा झाली. यामुळे या मार्गाचा देखील अवलंब न करण्याचं ठरलं. यानंतर सनदशीर म्हणजेच कायदेशीर मार्गाने जाण्याचा निर्णय झाला.

निवडणूक आयोगाच्या विरोधात रितसर कोर्टात याचिका दाखल करायची. या मार्गाने भूमिका मांडायची, असा निर्णय या बैठकीत ठरल्याची चर्चा आहे. पण न्यायालयीन लढाई लढताना त्याला कालमर्यादा नाही. पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या ३१ जानेवारीपर्यंत घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. यामुळे निवडणूक आयोग निवडणुका थांबवणं कठीण आहे. त्यामुळे याबाबत आता काय-काय घडामोडी घडतात? ते पाहणं महत्त्वाचं आहे.

दरम्यान, मनसे आणि ठाकरे गटाने निवडणूक आयोगाच्या विरोधात कोर्टात याचिका दाखल केली तर त्यांना ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पक्षाचा आणि काँग्रेस पक्षाचादेखील पाठिंबा राहणार आहे. महाविकास आघाडीचे नेते या विरोधात एकत्र न्यायालयीन लढाई लढण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon