अलिशान कारने रेकी करून घरफोड्या करणाऱ्या टोळीचा रायगड पोलिसांकडून पर्दाफाश; उत्तर प्रदेशातून तिघांना अटक, १५.५० लाखांचा ऐवज जप्त
योगेश पांडे / वार्ताहर
रायगड – रायगड जिल्ह्यातील उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये भरदिवसा घरफोड्या करून नागरिकांना लुटणाऱ्या आंतरराज्यीय सराईत चोरट्या टोळीचा पर्दाफाश रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (एलसीबी) पथकाने केला आहे. आलिशान होंडा सिटी कारमधून रेकी करून घरफोड्या करणाऱ्या या टोळीतील तिघांना उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली असून, पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून १५.५० लाखांचा सोन्याचा ऐवज आणि २४ जिवंत बुलेट्स जप्त केले आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून रायगड जिल्ह्यातील पाली, रोहा, महाड आणि श्रीवर्धन या तालुक्यांमध्ये भरदिवसा घरफोड्यांच्या घटना वाढल्या होत्या. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने चोरी केल्याने पोलिसांना सुरुवातीपासूनच आंतरराज्यीय टोळीचा संशय होता. आरोपी आलिशान कारमध्ये येत, परिसरात रेकी करत बंद घरे शोधत आणि योग्य संधी साधून दागदागिने व रोकड लंपास करत असत.
या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक ऑचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे, आणि एलसीबीचे पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली तीन स्वतंत्र तपास पथके तयार करण्यात आली. या पथकांनी रायगड, सातारा आणि रत्नागिरी परिसरात सातत्याने माहिती गोळा केली.
३ ऑगस्ट २०२५ रोजी माणगाव परिसरात आलिशान होंडा सिटी कार फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तातडीने नाकाबंदी उभारण्यात आली, परंतु आरोपींनी पोलिसांना चकवा देत नाकाबंदी फोडून पसार झाले. मात्र तपास पथकांनी हार न मानता वाहनाचा मागोवा घेत आरोपींचा ठावठिकाणा सिकंदराबाद (उत्तर प्रदेश) येथे शोधला.
सहायक पोलीस निरीक्षक भास्कर जाधव आणि मानसिंग पाटील यांच्या नेतृत्वाखाली ४० अंमलदार आणि ५ अधिकाऱ्यांचे विशेष पथक उत्तर प्रदेशात रवाना झाले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने बकर कसाब मोहल्ल्यात शस्त्रसज्ज छापा टाकण्यात आला. तणावपूर्ण कारवाईत पोलिसांनी शाहनवाज इकराम कुरेशी (५०), त्याची पत्नी हिना शाहनवाज कुरेशी (४५) आणि साथीदार शमीम इस्लाम कुरेशी (४२) यांना ताब्यात घेतले.
या कारवाईत पोलिसांनी सोन्याचे दागदागिने, रोकड आणि २४ जिवंत बुलेट्स असा एकूण १५.५० लाखांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींनी रायगड, रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यांत घरफोड्या केल्याची प्राथमिक कबुली दिली असून, पुढील तपास रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरू आहे.