पालघरमध्ये धक्कादायक प्रकार! भरदिवसा ज्वेलर्सवर गोळीबार; बंदूक पडली तरी सोनं लंपास, ‘मनी हाईस्ट’ची आठवण करून देणारी चोरी
योगेश पांडे / वार्ताहर
पालघर – पालघर जिल्ह्यातील बोईसर येथील गणेशनगर परिसरात भरदिवसा झालेल्या गोळीबाराने खळबळ उडाली आहे. दोन अज्ञात चोरट्यांनी चतुर्भुज ज्वेलर्स या दुकानावर हल्ला करत दरोड्याचा प्रयत्न केला. दुकान मालकाला बंदुकीचा धाक दाखवत सोन्याचे दागिने लंपास करताना चोरट्यांनी दोन राउंड फायर केले. सुदैवाने ज्वेलर्स मालकाचा जीव वाचला, मात्र या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दुकानात मालकासोबत झटापट सुरू असताना आरोपींनी घाईत गोळीबार केला. दरम्यान, गोंधळाच्या परिस्थितीत चोरट्यांच्या हातातून बंदूक खाली पडली तरी त्यांनी चोरीचा प्रयत्न थांबवला नाही. काही सेकंदात दागिने उचलून चोरटे दुचाकीवरून पसार झाले. घटनेचा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच बोईसर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आरोपींच्या हाती राहिलेली रिव्हॉल्व्हर जप्त केली असून, परिसरात नाकाबंदी करून शोधमोहीम सुरू केली आहे. या प्रकरणाचा तपास पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोघे आरोपी दुचाकीवरून पळताना दिसत आहेत, त्यांच्या मागे काही नागरिक धावत असल्याचेही स्पष्ट दिसते. पोलिसांनी या फुटेजच्या आधारे तपास जलदगतीने सुरू केला आहे. डिटेक्शन टीम, स्थानिक गुन्हे शाखा आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले असून, आरोपींचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी सांगितले की, “चोरट्यांनी दरोड्याचा प्रयत्न करताना गोळीबार केला असला तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. घटनास्थळी सापडलेले शस्त्र जप्त करण्यात आले असून, तपास जलदगतीने सुरू आहे. लवकरच आरोपींना अटक केली जाईल.”
या घटनेनंतर बोईसर परिसरात एकच खळबळ उडाली असून, स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरातील गस्त आणि सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याच्या सूचना दिल्या आहेत.