महाराष्ट्रात रिक्षा, टॅक्सी आणि बस चालकांकडून संपाची हाक; मुंबई, पुणे आणि ठाण्यात चक्का जाम आंदोलनामुळे जनजीवन विस्कळीत

Spread the love

महाराष्ट्रात रिक्षा, टॅक्सी आणि बस चालकांकडून संपाची हाक; मुंबई, पुणे आणि ठाण्यात चक्का जाम आंदोलनामुळे जनजीवन विस्कळीत

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई – राज्यातील ई-चलन प्रणाली आणि पोलिसांच्या कथित डिजीटल दरोड्याविरोधात राज्यातील विविध वाहतूकदार संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. ५ मार्चच्या मध्यरात्रीपासून महाराष्ट्र ट्रान्सपोर्टर्स अ‍ॅक्शन कमिटीने बेमुदत संपाची हाक दिली आहे. या बेमुदत संपामुळे मुंबई, पुणे आणि ठाणे या प्रमुख शहरांमधील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याचे पाहायला मिळत आहे.

ठाण्यातील मुलुंड जकात नाका परिसरात आज सकाळपासूनच तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. बस ओनर सेवा संघ आणि इतर संघटनांनी हातात काळे झेंडे घेऊन आपल्या बस गाड्या रस्त्याच्या मधोमध उभ्या केल्या, ज्यामुळे चक्का जाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी आंदोलकांनी पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले आहे. सध्या नवघर पोलिसांनी संपूर्ण परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.

राज्यातील ई-चलन प्रणाली विरुद्ध पुण्यातही चालक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवारी सकाळी ११ वाजल्यापासून रिक्षा संघटना आणि मालवाहतूकदार संयुक्त कृती समितीने जोरदार निदर्शने केली. ई-चलनाच्या माध्यमातून केली जाणारी बेकायदेशीर वसुली थांबवावी, या मागणीसाठी पुण्यात दोन तास रिक्षा आणि प्रवासी मालवाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती.

मुंबईतील आझाद मैदानावर सुमारे ५०० ते १००० वाहतूक व्यावसायिक एकत्र येऊन शक्तीप्रदर्शन केले. या आंदोलनात केवळ जड ट्रकच नाही, तर स्कूल बस, खाजगी ट्रॅव्हल्स, टेम्पो, टॅक्सी आणि रिक्षा संघटनांनीही सहभाग नोंदवला आहे. एकाच चुकीसाठी दिवसातून अनेक वेळा ई-चलन फाडले जाते. तसेच पार्किंगची सुविधा नसतानाही दंड आकारला जातो, असे मत आंदोलकांनी व्यक्त केले आहे.
याप्रकरणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत झालेली उच्चस्तरीय बैठक निष्फळ ठरल्याचे समितीने सांगितले आहे. सरकार केवळ तोंडी आश्वासने देत आहे. जोपर्यंत याचा अधिकृत जीआर निघत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही, असा इशारा वाहतूकदारांनी दिला आहे. आता या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय तोडगा काढतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जर गुरुवारी याचा ठोस निर्णय झाला नाही, तर हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा पत्रकार परिषदेत देण्यात आला आहे.

या संपात स्कूल बस असोसिएशन सहभागी झाले आहे. त्यामुळे शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे, विशेषतः बोर्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल होण्याची शक्यता आहे. तसेच यामुळे दूध, भाजीपाला आणि इंधन पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. यावर पुढील ४८ ते ७२ तासांत परिणाम होऊ शकतो. टॅक्सी आणि रिक्षाच्या कमतरतेमुळे मुंबई-पुण्यातील नोकरदारांना प्रवासासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon