मुंबईतील खार येथे २४ वर्षीय विवाहित तरुणी ठरली हुंडाबळी; पतीसह सासरच्या चार जणांना अटक
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मुंबई शहरातील खार येथे एक विवाहित तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. नेहा गुप्ता असं २४ वर्षीय तरुणीचं नाव असून हुंड्यासाठी सासरच्यांनी तिची हत्या केल्याचा खळबळजनक आरोप नेहाच्या वडिलांनी केला आहे. हुंड्यासाठी छळ केल्याप्रकरणी नेहा हिचा पती व सासरच्या चार जणांना पोलिसांनी अटक केली असून नेहा हिला काही दिवसांपासून जेवणातून विष मिसळून दिले जात असल्याचा आरोप नेहाच्या पालकांनी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशातील नेहाचे कुटुंबीयांच्या परिचयातील अरविंद गुप्ता याच्यासोबत नोव्हेंबर २०२४ मध्ये लग्न झाले होते. लग्नावेळी नऊ लाख रोख, दोन किलो चांदी आणि १८ तोळे सोने हुंडा म्हणून नेहाच्या कुटुंबीयांनी अरविंदला दिले. लग्नानंतर अरविंद हा पत्नीसह मुंबईतील खार येथे राहण्यासाठी आला. मात्र नंतर अरविंदसह त्याच्या कुटुंबीयांनी नेहाला त्रास देण्यास सुरुवात केल्याचा आरोप नेहाच्या वडिलांनी तक्रारीत केला आहे.
नेहा गुप्ता हिचा तिच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या काही दिवस आधीच मृत्यू झाला आहे. प्रकृती बिघडल्याने नेहाला १६ ऑक्टोबर रोजी रात्री प्रथम एका स्थानिक रुग्णालयात नेण्यात आलं. परंतु प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने तिथून तिला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आलं. काही तासांनंतर तिला घरी सोडण्यात आलं, पण घरी पोहोचल्यानंतर काही वेळातच ती पुन्हा कोसळली. तिला तातडीने पुन्हा दुसऱ्या रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र तिथे तिचा मृत्यू झाला.
नेहाच्या वडिलांनी पोलिसांना सांगितलं की, लग्नानंतर लगेचच अरविंद आणि त्याच्या कुटुंबाकडून नेहाचा छळ सुरू झाला होता. नेहाने तिच्या वडिलांना सांगितलं होतं की, तिला विष दिले जात आहे व तिचा पती व सासरचे लोक हुंड्यासाठी तिला त्रास देत आहेत. नेहाने हेही सांगितलं होतं की, तिला इथं खूप विचित्र वाटत आहे आणि तिची मानसिक स्थिती ठीक नाही.
नेहाच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी आपल्या मुलीच्या लग्नात अरविंद गुप्ताला सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि घरगुती उपकरणे यांसारख्या अनेक मौल्यवान वस्तू हुंडा म्हणून दिल्या होत्या. या वस्तूंची किंमत अंदाजे २८ लाख रुपये होती. परंतु तरीही, अरविंद गुप्ता याच्या कुटुंबाला आणखी पैसे व एक महागडी रॉयल एनफिल्ड बाईक हवी होती. नेहाच्या माहेरच्या लोकांनी या मागण्या पूर्ण करण्यास नकार दिल्यानंतर छळ वाढला. नेहाच्या जेवणात विषारी औषधे मिसळून तिला वारंवार बेशुद्ध पाडलं जात होतं, ज्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करावं लागलं. तिचा जबरदस्तीने गर्भपातही करण्यात आल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी अरविंद गुप्ता व त्याच्या कुटुंबातील पाच जणांविरुद्ध हुंडाबळी, विष देऊन इजा पोहोचवणे आणि खुनाच्या प्राथमिक कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. अंतिम वैद्यकीय अहवालानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.