मुदतबाह्य बिअर पिणे पडले महागात! कल्याणमधील तरुणाची प्रकृती बिघडली
रिअल बिअर शॉपमध्ये एक्सपायरी डेटच्या बिअर बाटल्या सापडल्या; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
पोलीस महानगर नेटवर्क
कल्याण – कल्याणमध्ये एक्सपायरी डेट उलटलेल्या म्हणजेच मुदतबाह्य झालेल्या बिअरचे सेवन केल्याने एका तरुणाची प्रकृती बिघडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अजय म्हात्रे (रा. गौरीपाडा, कल्याण पश्चिम) या तरुणावर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
ही घटना उघड झाल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने तत्काळ कारवाई करत प्रेम आटो परिसरातील “रिअल बिअर शॉप” येथे धाड टाकली. तपासादरम्यान अधिकाऱ्यांना एक्सपायरी डेट झालेल्या बिअरच्या बाटल्यांचा साठा सापडला असून तो ताब्यात घेण्यात आला आहे.
माहितीनुसार, अजय म्हात्रे यांनी सोमवारी रात्री या दुकानातून दोन बिअरच्या बाटल्या खरेदी केल्या होत्या. घरी जाऊन बिअर पिल्यानंतर त्यांची प्रकृती अचानक खालावली. कुटुंबीयांनी तत्काळ त्यांना रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये दाखल केले. घटनेची माहिती समजताच म्हात्रे यांचे काही मित्र रिअल बिअर शॉपमध्ये गेले असता, दुकानात एक्सपायरी डेटच्या बाटल्या ठेवण्यात आल्याचे त्यांना आढळले.
या घटनेची माहिती त्यांनी महात्मा फुले चौक पोलिसांना दिली. पोलिसांनी तत्काळ राज्य उत्पादन शुल्क विभागाला कळवले. मंगळवारी सकाळी विभागाच्या पथकाने दुकानात जाऊन तपासणी केली असता मुदतबाह्य बिअरचा साठा उघडकीस आला.
दरम्यान, मुदत संपलेल्या बिअरचे विक्रीप्रकरण समोर आल्यानंतर संबंधित दुकानावर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलिसांकडून या प्रकरणात कोणती पुढील कारवाई केली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.