छटपूजेहून परतताना अघटित घडलं, तरुणाच्या मृत्यूने मुंबई हळहळली

Spread the love

छटपूजेहून परतताना अघटित घडलं, तरुणाच्या मृत्यूने मुंबई हळहळली

योगेश पांडे – वार्ताहर

मुंबई – रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे केवळ वाहतूक कोंडीच होत नाही तर अनेकदा प्रवाशांचे जीवही जातात. अद्यापही मुंबईतील खड्ड्यांचा विषय निकाली काढण्यात आलेला नाही. त्यातही जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवरील खड्ड्यामुळे एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या तीन महिन्यात खराब रस्त्यामुळे तीन जणांचा बळी गेला आहे.

पवई परिसरात पुन्हा एकदा धोकादायक रस्त्याने तरुणाचा बळी घेतला आहे. पवई प्लाझा, जेव्हीएलआर समोर रविवारी रात्री घडलेल्या अपघातात राहुल विश्वकर्मा (२४) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, राहुल पवई येथे छटपूजा आटोपून आपल्या बहिणीसह विक्रोळी येथे घरी परतत होता. दरम्यान, जेव्हीएलआरवरील असमान आणि पॅच असलेल्या रस्त्यावरून त्याची दुचाकी घसरली. त्यात तो रस्त्यावर कोसळला. त्याच वेळी बाजूने जाणाऱ्या खाजगी बसने त्याला चिरडलं. ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून, धोकादायक रस्त्यामुळे गेल्या दोन महिन्यांतील ही तिसरी मृत्यूची घटना असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. नागरिकांमध्ये प्रचंड रोष व्यक्त होत असून,वारंवार होणाऱ्या अपघातांसाठी रस्त्यांची दुरावस्था आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणाला जबाबदार धरत आहेत. स्थानिकांनी तातडीने रस्ता दुरुस्ती आणि सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

मंगळवारी संतप्त होत शिवसेना आमदार दिलीप लांडे संबंधित अधिकाऱ्यांना घेऊन या रस्त्यावर उतरले. ७२ तासात हा रस्ता पूर्ण दुरुस्त झाला नाही तर सगळ्या अधिकाऱ्यांच्या कानशीलात लगावेन अशी धमकीच त्यांनी अधिकाऱ्यांना दिली. तसेच स्वत: उभं राहून हे खड्डे बुजवून घेतले. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. स्वतःची सत्ता असली तरी जनतेसाठी रस्त्यावर उतरण्याची शिकवण आहे. जर हा रस्ता बनला नाही, तर नक्कीच अधिकारी, ठेकेदार यांच्या कानशिलात लावू अशी प्रतिक्रिया यावेळी आमदार दिलीप लांडे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon