घोडबंदर रोडवर अडथळ्यांची शर्यत; ५६० कोटी खर्चूनही कोंडी कायम
योगेश पांडे / वार्ताहर
ठाणे – घोडबंदर रोडवर वारंवार वाहतूक कोंडी होते, कारण हा ठाणे, मुंबई, गुजरात आणि इतर ठिकाणांना जोडणारा महत्त्वाचा रस्ता आहे. या कोंडीची कारणे रस्त्यावरील खड्डे, अवजड वाहनांची गर्दी, पायाभूत सुविधांची कमतरता आणि सध्या सुरू असलेले रस्ते रुंदीकरणाचे प्रकल्प आहेत. यामुळे नागरिकांना कामावर जाण्यासाठी आणि परत येण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागतो.
घोडबंदर भागातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी या ठिकाणी सेवा रस्ता मुख्य रस्त्यात विलीनीकरणाचे काम पावसाळ्यानंतर पुन्हा एकदा सुरू झाले आहे; परंतु हा सेवा रस्ता मुख्य रस्त्यात येत असताना अद्यापही अडथळ्यांची शर्यत संपलेली नाही. याठिकाणी विद्युत पोल, महावितरणच्या डीपी, महापालिकेच्या माध्यमातून उभारण्यात आलेली शौचालये, पादचारी पुलाचा भाग आणि आता तर मेट्रोचे पिलर त्यामध्ये आले आहेत.
भविष्यात विद्युत पोल, महावितरण डीपी हलविण्यात येणार असले तरी पादचारी पुलाचा भाग आणि मेट्रोच्या पिलरचे काय करणार हा प्रश्न अनुत्तरीत आहे.घोडबंदर भागातील वाहतूक कोंडी कमी व्हावी यासाठी सेवा रस्त्याचे मुख्य रस्त्यात विलीनीकरणाचे काम हाती घेतले असून हे काम कापूरबावडी ते गायमुखपर्यंत १०.५० किमी अंतराचे आहे. घोडबंदर मार्गावरील या रस्त्याचे पूर्णपणे काँक्रीटीकरण करण्यात येत आहे.
या कामासाठी ५६० कोटींचा खर्च केला जात आहे.विद्युत पोल, डीपी स्थलांतरित करण्यासाठी ७० कोटींचा खर्चया रस्त्याचे काम वेगाने सुरू असले तरी या कामात ४५ हून अधिक विद्युत पोल आडवे आले आहेत. तसेच महावितरणचे आठ ते दहा डीपी रस्त्याच्या मध्यभागी आहेत. ते हटविण्यासाठी ७० कोटींचा प्रस्ताव पालिकेने तयार केला. परंतु हा प्रस्ताव करताना या रस्त्याच्या कडेला डक ठेवण्यात आल्याचा दावा केला.
काही महिन्यांपूर्वी बांधलेल्या सार्वजनिक शौचालयावर हातोडासार्वजनिक शौचालये महापालिकेच्या माध्यमातून अगदी काही महिन्यांपूर्वीच उभारली आहेत; परंतु आता त्यांच्यावर हातोडा पडणार आहे. याच मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा मेट्रोचे काम सुरु आहे. घोडबंदरकडे जाताना अनेक ठिकाणी सेवा रस्त्यावरच मेट्रोचे पिलर आहेत, काही ठिकाणी मेट्रोचे स्टेशन आहे.