रिॲलिटी चेक ! आदित्य ठाकरेंनी दाखवली ३८ मतदारांची यादी, त्या खोलीत आता कुणीही राहात नाही

Spread the love

रिॲलिटी चेक ! आदित्य ठाकरेंनी दाखवली ३८ मतदारांची यादी, त्या खोलीत आता कुणीही राहात नाही

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर विरोधकांनी पराभवाची कारणे शोधताना अगोदर ईव्हीएम मशिनमध्ये घोळ असल्याचा आरोप केला. त्यानंतर, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मतदार यादीत मोठा घोळ असल्याचे समोर आणले होते. आता, महाविकास आघाडीचे नेतेही मतदार यादीतील घोळ आणि बोगस मतदान समोर आणत आहेत. त्यातच, शिवसेना पक्षाच्या निर्धार मेळाव्यात आदित्य ठाकरेंनी प्रेझेंटेशन दाखवत वरळी मतदारसंघातील बोगस मतदार आणि मतदार याद्याबाबत गंभीर आरोप केले आहेत. वरळीतील एका खोलीत ३८ मतदार राहत असल्याचेही त्यांनी व्हिडीओतून दाखवलं होतं. आता, तेच किती खरं याची माहिती एबीपी माझाने घेतली आहे.

वरळीतील एका खोलीत खरंच ३८ मतदार राहतात का? आदित्य ठाकरे यांनी दाखवलेल्या व्हिडिओतील खोलीमध्ये नेमकं कोण राहतं, मतदार राहतात कां? याची माहिती आम्ही घेतली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात आदित्य ठाकरे यांनी वरळीतील मतदार यादीतील घोळ समोर आणला. यावेळी त्यांनी लोअर परेलमधील एका वस्तीतील लहानशी खोली दाखवत त्या खोलीतील ३८ जण मतदार यादीमध्ये, त्याच पत्त्यावर दिसत असल्याचं सांगितलं.

मतदार याद्यांमध्ये जे ३८ नावं आहेत, त्यातील एकही व्यक्ती त्या खोलीमध्ये राहत नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. या खोलीमध्ये एक नेपाळहून आलेलं ४ जणांचं कुटुंब राहतं, जे मुंबईतील मतदार नाही. त्यांनी ही खोली सहा महिन्यापूर्वी भाडेतत्त्वावर घेतली आहे, अशी माहिती समोर आली. आपण येथील आंबेडकर नगरमधील इतर लोकांना सुद्धा हे मतदार येथे राहतात का? याबद्दल विचारपूस केली. मात्र, त्यांनी सुद्धा याबद्दल माहिती नसल्याचे स्पष्ट सांगितले.

दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदारसंघातील मतदार याद्यातील घोळ समोर आणले. त्यामध्ये वरळीतील ए टू झेड इंडस्ट्रीजमध्ये असलेल्या घसीटाराम हलवाई या दुकानाच्या पत्त्यावर ४६ मतदार राहतात असं समोर आलं. मात्र, या ठिकाणी रिअलिटी चेक केलं असता २०१८ साली हे दुकान मुंबई महापालिकेकडून पाडण्यात आलं आहे. त्यानंतर तिथे अजून कुठलीही इमारत बांधण्यात आली नाही. आजूबाजूच्या ठिकाणी विचारणा केली असता त्या ठिकाणी काही उत्तर भारतीय कामगार काम करत होते, त्यांनी मतदार कार्ड तयार केलं असेल असं कारण आजूबाजूच्या कॉर्पोरेट कार्यालयामध्ये काम करणाऱ्या नोकरदार वर्गाने दिले. त्यामुळे, हे मतदार गेले कुठं, असा प्रश्न यानिमित्ताने पडला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon