कार्तिकी वारीसाठी ११५० ज्यादा एसटी बसेस; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – आषाढी एकादशीनंतर पंढरपुरात होणाऱ्या कार्तिक वारीला मोठे महत्त्व आहे. यावर्षी २ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशीचा सोहळा होत असून, यासाठी जवळपास ८ ते ९ लाख भाविक पंढरपुरात उपस्थित राहण्याची शक्यता आहे. भाविकांची ही प्रचंड गर्दी लक्षात घेऊन, राज्य परिवहन महामंडळाने यंदाच्या यात्रेसाठी विशेष व्यवस्था केली आहे.
राज्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी स्वतः पंढरपूरला भेट देऊन एसटी बसेसच्या व्यवस्थेचा आढावा घेतला. त्यांनी अधिकाऱ्यांना दिलेल्या सूचनेनुसार, यावर्षी कार्तिकी यात्रेसाठी ११५० हून अधिक जादा एसटी बसेस सोडण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे राज्यातील लाखो भाविकांचा प्रवास सुलभ होणार आहे.
प्रवाशांसाठी सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे, यंदा राज्यातील मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ अशा सर्वच भागातून पंढरपूरकडे धावणाऱ्या बसेस बहुतांशी नव्या कोऱ्या ‘लाल परी’ असतील. परिवहन मंत्री सरनाईक यांनी अधिकाऱ्यांसोबत आढावा घेताना, इलेक्ट्रिक बससह नव्या बसेस पंढरपूरला सोडण्यात याव्यात, अशा स्पष्ट सूचना दिल्या. यामुळे पंढरपूरची कार्तिकी वारी यंदा राज्यातील भाविकांसाठी अधिक सुखकर होणार आहे.
कार्तिकी वारीच्या सोहळ्यासाठी एसटी महामंडळाकडून पंढरपूरमध्ये भाविकांच्या सोयीसाठी भव्य ‘चंद्रभागा बस स्थानक’ देखील निर्माण करण्यात आले आहे. या स्थानकामुळे मोठ्या संख्येने येणाऱ्या बसेसचे व्यवस्थापन आणि भाविकांचे दळणवळण सुव्यवस्थित होईल. एकादशीचा सोहळा संपल्यानंतरही भाविकांना परत जाण्यासाठी या मार्गावर पुरेसा एसटी बसचा पुरवठा ठेवण्यात येणार आहे.