परंपरागत ‘ड्राय डे’ला अपवाद; होळी, मोहर्रम, गांधी जयंतीला मद्यविक्रीस परवानगी
मुंबई : महाराष्ट्र सरकारने उत्पादन शुल्क धोरणात महत्त्वपूर्ण बदल करत होळी, मोहर्रम आणि गांधी जयंती या परंपरागत ‘ड्राय डे’ दिवशी दारूविक्रीस परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार अधिकृत मद्यविक्री दुकाने या दिवशी नियमितपणे सुरू राहतील, अशी माहिती उत्पादन शुल्क विभागाने दिली.
या निर्णयामागे बेकायदेशीर व काळ्या बाजारातील मद्यविक्रीवर आळा घालणे आणि राज्याचा महसूल वाढवणे हा मुख्य उद्देश असल्याचे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ‘ड्राय डे’च्या दिवशी बंदीमुळे अनधिकृत विक्रीला चालना मिळते; परिणामी कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न आणि महसुली नुकसान होते, असा युक्तिवाद सरकारकडून करण्यात येत आहे.
मात्र, या निर्णयावर सामाजिक व सांस्कृतिक परिणामांबाबत तीव्र मतभेद व्यक्त होत आहेत. परंपरेशी जोडलेल्या दिवसांवरील सवलत योग्य की अयोग्य, सार्वजनिक आरोग्य व सामाजिक शिस्तीवर याचा परिणाम काय होईल, यावर चर्चा सुरू झाली आहे. काही सामाजिक संघटनांनी निर्णयाला विरोध दर्शवला असून, तर व्यापारी संघटनांनी स्वागत केले आहे.
दरम्यान, अंमलबजावणीदरम्यान कायदा-सुव्यवस्था आणि सार्वजनिक शांतता राखण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्यात येईल, तसेच नियमभंग करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असेही उत्पादन शुल्क विभागाने स्पष्ट केले आहे.