उधारी’ विचारणे दुकानदाराच्या जीवावर बेतले; संतप्त नशेखोरांनी थेट धारदार शस्त्राने केला जीवघेणा हल्ला
योगेश पांडे / वार्ताहर
कल्याण – कल्याण जवळच्या बल्याणी परिसरात नशेखोरांचा हैदोस दिवसेंदिवस वाढत असून, येथील कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या भागात किरणामालाचे दुकान असलेल्या एका दुकानदाराने ‘उधारी’ देण्यास नकार दिल्याने, संतप्त झालेल्या नशेखोरांनी थेट धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्राणघातक हल्ल्यात दुकानदार आणि त्याचा भाऊ गंभीर जखमी झाले असून, स्थानिकांनी मध्यस्थी केल्यामुळेच त्यांचा जीव वाचला. मात्र, या गंभीर प्रकरणात पोलीस गांभीर्य दाखवत नसल्याचा थेट आरोप जखमी दुकानदाराने केला आहे.
कल्याणनजीक असलेल्या बल्याणी परिसरात श्रीकांत यादव यांचे किराणा मालाचे दुकान आहे. बुधवार, २३ ऑक्टोबर रोजी दुकानात हसन शेख नावाचा तरुण आपल्या साथीदार शाने अली याच्यासोबत आला. हसन शेख याने काही वस्तूंची मागणी केली. मात्र, यापूर्वीची मोठी उधारी थकल्याने दुकानदार यादव यांनी हसनला आधी ती उधारी चुकती करण्याची मागणी केली. या कारणावरून हसन शेख कमालीचा संतप्त झाला. त्याने कोणताही विचार न करता कमरेला लावलेला धारदार चाकू बाहेर काढला आणि दुकानदार श्रीकांत यादव यांच्यावर जीवघेणा हल्ला केला.
या हल्ल्यामुळे दुकानात एकच गोंधळ उडाला. श्रीकांत यादव यांचे भाऊ रमाकांत यादव हे भांडण सोडवण्यासाठी आणि आपल्या भावाला वाचवण्यासाठी पुढे आले. त्यावेळी हल्लेखोर हसन शेख याने त्यांच्यावरही हल्ला करत प्राणघातक वार केले. आजूबाजूच्या परिसरातील लोक हा प्रकार पाहून त्वरित जमा झाले आणि त्यांनी धाडसाने मध्यस्थी करत हल्लेखोर हसन शेख याच्याकडून धारदार शस्त्र हिसकावून घेतले. स्थानिकांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे श्रीकांत यादव आणि रमाकांत यादव यांचा जीव थोडक्यात वाचला. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले आहेत.
या घटनेनंतर जखमी दुकानदार श्रीकांत यादव यांनी पोलीस प्रशासनाच्या कारवाईवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणाले की, “मी फक्त उधारी मागितली म्हणून माझ्यावर हल्ला करण्यात आला. बल्याणी परिसरात नशेखोरांचा हा हैदोस दररोज वाढत आहे. रोजच काही ना काही त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. आम्ही दोघे या हल्ल्यातून थोडक्यात बचावलो, अन्यथा आम्ही जीवानिशी गेलो असतो. मात्र, इतक्या गंभीर घटनेतही टिटवाळा पोलीस योग्य गांभीर्य दाखवत नाहीत.” श्रीकांत यादव यांच्या या आरोपांमुळे स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या परिसरातील वाढत्या नशेखोरांवर आणि त्यांच्या उपद्रवावर पोलिसांकडून त्वरित आणि कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.