सायबर गुन्ह्यांविरोधात जनजागृती; ठाण्यात नागरिकांसाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रम
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे : सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने कॉसमॉस होरेझॉन सोसायटी, ठाणे येथे विशेष जनजागृती व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात सायबर फसवणूक, ऑनलाइन आर्थिक गुन्हे, सोशल मीडियावरील धोके याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
पोलीस अधिकाऱ्यांनी नागरिकांना सायबर गुन्हा घडल्यास तात्काळ डायल 112 वर संपर्क साधण्याचे तसेच आर्थिक सायबर गुन्ह्यांसाठी 1930 या राष्ट्रीय हेल्पलाईनवर तक्रार नोंदवण्याचे आवाहन केले. याशिवाय, ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी विकसित करण्यात आलेल्या ‘आधारवर्ड’ ॲपबाबत माहिती देऊन त्याचा वापर कसा करायचा, याचे प्रात्यक्षिकही दाखवण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान सायबर गुन्हे टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी, संशयास्पद कॉल, लिंक किंवा संदेशांपासून दूर राहण्याचे महत्त्व, तसेच सुरक्षित पासवर्ड व डिजिटल व्यवहार करताना घ्यावयाच्या काळजीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून शंका दूर केल्या.
सायबर गुन्ह्यांविरोधातील लढ्यात नागरिकांची जागरूकता महत्त्वाची असून, अशा उपक्रमांमुळे समाज अधिक सुरक्षित बनेल, असा विश्वास आयोजक व पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.