नकाब ओढण्याच्या घटनेवरून नितीश कुमार यांच्यावर कारवाईची मागणी; ऑल इंडिया उलमा बोर्डाचे राष्ट्रपतींना निवेदन
मनाठकर / प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात एका मुस्लीम तरुणीचा नकाब ओढल्याच्या घटनेवरून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, या प्रकरणी कडक कारवाई करण्याची मागणी ऑल इंडिया उलमा बोर्ड (वक्फ विंग) यांनी केली आहे. बोर्डाच्या वतीने आज विभागीय आयुक्तांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात या घटनेला अत्यंत दुर्दैवी, आक्षेपार्ह आणि स्त्रीच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचा भंग करणारी म्हटले आहे. कोणत्याही महिलेच्या धार्मिक श्रद्धा, पोशाख किंवा वैयक्तिक मर्यादांमध्ये तिच्या संमतीशिवाय हस्तक्षेप करणे हे असंविधानिक व असंवेदनशील कृत्य ठरते, असे बोर्डाने नमूद केले. मुख्यमंत्रीपदासारख्या जबाबदारीच्या पदावर असलेल्या व्यक्तीकडून अशी कृती होणे समाजाला चुकीचा संदेश देणारे असल्याचा आरोपही करण्यात आला.
सार्वजनिक मंचावर स्त्रीचा अपमान झाल्याबद्दल बोर्डाने तीव्र निषेध नोंदवला आहे. निवेदनाद्वारे पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत : (१) संबंधित तरुणीची सार्वजनिक माफी मागावी, (२) महिलांच्या स्वातंत्र्याचा सन्मान राखण्याची स्पष्ट हमी द्यावी, (३) भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सत्ताधाऱ्यांना संवेदनशीलतेचे प्रशिक्षण द्यावे. तसेच नितीश कुमार यांना मुख्यमंत्रीपदावरून दूर करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
निवेदन सादर करताना ऑल इंडिया उलमा बोर्डाचे महाराष्ट्र अध्यक्ष शेख आसीफ, कार्याध्यक्ष शेख रईस, शहर अध्यक्ष अशरफ पठाण, उपाध्यक्ष सय्यद अहमद, शहर अध्यक्ष शेख सोहेल, तोसीफ शेख, मुजीब खान, आसमा खान, फरहीन सय्यद आणि समशद बागवान उपस्थित होते.