कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या वतीने सोसायटी पदाधिकाऱ्यांसह नागरिकांसाठी सायबर व गुन्हे प्रतिबंधक जनजागृती
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे : कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या वतीने परिसरातील सोसायटी पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत चेन स्नॅचिंग, मोबाईल स्नॅचिंग, ऑनलाईन फसवणूक, सायबर सुरक्षा तसेच अमली पदार्थांशी संबंधित गुन्ह्यांबाबत सविस्तर जनजागृती करण्यात आली. सदर बैठकीस सुमारे ३० ते ४० सोसायटींचे पदाधिकारी उपस्थित होते.
तसेच कापूरबावडी पोलीस ठाणे हद्दीतील कल्पतरू पॅरामाउंट सोसायटी येथे रहिवासी नागरिक, महिला, लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात सायबर जनजागृती, ऑनलाईन फसवणूक, महिला सुरक्षा तसेच ज्येष्ठ नागरिकांवरील फसवणुकीच्या गुन्ह्यांबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
या वेळी पोलीस उपनिरीक्षक श्री. सांगळे, ईगल ब्रिगेड फाउंडेशनचे श्री. विश्वनाथ बीवलकर, गोपनीय अंमलदार तसेच पोलीस हवालदार गरजे यांनी उपस्थित नागरिकांना उपयुक्त माहिती दिली. या कार्यक्रमास सुमारे १०० ते १५० नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत उपस्थिती लावली.
जनतेच्या सुरक्षिततेसाठी ठाणे पोलीस सदैव तत्पर असून नागरिकांनी सतर्क राहून कोणतीही संशयास्पद बाब तात्काळ पोलिसांना कळवावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.