पोलिसांनी अत्याचार केल्याचा हातावर लिहिलं अन् महिला डॉक्टरनं जीवन संपवलं; आरोपी पोलिस निरीक्षक फरार, महिला आयोगाने दिली मोठी माहिती

Spread the love

पोलिसांनी अत्याचार केल्याचा हातावर लिहिलं अन् महिला डॉक्टरनं जीवन संपवलं; आरोपी पोलिस निरीक्षक फरार, महिला आयोगाने दिली मोठी माहिती

योगेश पांडे / वार्ताहर

सातारा – सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रूग्णालयात महिला डॉक्टरने आत्महत्या केलीय. मात्र आता या आत्महत्या प्रकरणाला धक्कादायक वळण लागलंय. मृत डॉक्टरच्या हातावर सुसाईड नोट आढळली आहे. या सुसाईड नोटमध्ये महिला डॉक्टरने आपल्यावर बलात्कार झाल्याचं लिहिलंय. त्यात त्यांनी पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदनेचं नाव लिहीलंय. पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदनेनं चारवेळा बलात्कार केल्याचं सुसाईड नोटमध्ये लिहिलंय. तसंच आरोपी प्रशांत बनकर यानेही मानसिक त्रास दिल्याचं सुसाईड नोटमध्ये म्हटलंय. काही महिन्यांपासून त्या पोलीस आणि आरोग्य विभागातील वादात अडकल्या होत्या अशी माहिती समोर येतेय. वैद्यकीय तपासणीसंदर्भात पोलिसांशी वादानंतर त्यांची चौकशी सुरू होती असं समजतंय. मात्र डॉक्टरच्या मृतदेहाच्या हातावर थेट सुसाईड नोट आढळलीय. त्यात त्यांनी पोलिसानेच बलात्कार झाल्याचं नमूद करत आत्महत्या केल्याचं म्हटलंय.

फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून घेतली आहे. त्यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्याला तत्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले असून, आरोपींवर कठोर कारवाई करण्याचेही निर्देश देण्यात आले आहे. यानंतर पोलिसांकडून गोपाळ बदनेचे तत्काळ निलंबन करण्यात आले आहे. सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी म्हणाले की, आम्ही या प्रकरणात गुन्हा दाखल केलेला आहे. एका आरोपीचे नाव पीएसआय गोपाल बदने आहे. तो फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचा आहे. दुसरा आरोपी प्रशांत बनकर आहे. तो पोलीस नसून तो सामान्य नागरिक आहे. या प्रकरणात आम्ही गोपाल बदने याला निलंबित करत आहोत, अशी माहिती तुषार दोषी यांनी दिली.

सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने पोलीस निरीक्षक गोपाल बदने यांनी केलेल्या लैंगिक अत्याचारामुळे आत्महत्या केल्याचे त्यांच्या सुसाइड नोटमुळे समोर आले आहे. तसेच प्रशांत बनकर याने मानसिक त्रास दिल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. राज्य महिला आयोगाने याची दखल घेतली आहे. सद्यस्थितीत याप्रकरणी फलटण सिटी पोलीसमध्ये भारतीय न्याय संहितेच्या कलम 64 (2) (N), 108 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. फरार आरोपी गोपाल बदने आणि प्रशांत बनकर यांना अटक करण्यासाठी शोधपथक रवाना करण्यात आले आहे. मयत डॉक्टर यांचे शव विच्छेदनसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. फरार आरोपींचा तातडीने शोध घेऊन संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करावा असे निर्देश आयोगाने पोलीस अधीक्षक, सातारा यांना दिले आहेत. पीडित महिलेने याआधी त्यांना होणाऱ्या त्रासाबाबत तक्रार केली असल्यास त्यांना मदत का मिळाली नाही याचीही चौकशी व्हावी आणि संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशा सूचना आयोगाने पोलिसांना दिल्या आहेत.

याबाबत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर म्हणाल्या की, घडलेली घटना अत्यंत संतापजनक आहे. या प्रकरणाची मी माहिती घेतली आहे. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हे दाखल केलेले आहेत. यामधील आरोपी पोलीस निरीक्षक गोपाल बदने आणि पोलीस प्रशांत बनकर या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेले आहे. हे दोघेही फरार आहेत. त्यांच्या तपासासाठी दोन पथक तयार करण्यात आलेले आहेत. पोलिसांचे पथक त्यांच्या शोधासाठी रवाना झालेले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. तर या प्रकरणात पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी समोर येतील आणि तपास करणे सोयीचे ठरेल. परंतु घडलेली घटना ही अत्यंत निंदनीय आहे. रक्षकानेच असे कृत्य करावे हे अत्यंत दुर्दैवी आहे. यामधील आरोपींवर कडक कारवाई व्हावी यासाठी आम्ही पाठपुरावा करू, असे देखील रुपाली चाकणकर यांनी म्हटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon