परवानगीशिवाय मद्य आढळल्यास कडक कारवाई; संबंधित अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरणार – गृहराज्यमंत्री भोयर
.
योगेश पांडे/ वार्ताहर
मुंबई : परवानगीशिवाय हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये मद्य आढळल्यास संबंधितांचे परवाने रद्द करण्यासह त्या क्षेत्रातील पोलीस व प्रशासनिक अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात येईल, असा इशारा गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधान परिषदेत दिला.
विधान परिषदेतील प्रश्नोत्तराच्या तासात आमदार दादाराव केचे यांनी वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील हॉटेलमधील कथित अवैध व्यवसायाबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना भोयर यांनी राज्य सरकारचा कठोर भूमिका स्पष्ट केली.
भोयर म्हणाले, संबंधित भागात परवानगीशिवाय मद्यविक्री आढळल्यास केवळ हॉटेल मालकांवरच नव्हे, तर त्या क्षेत्रातील पोलीस व प्रशासनातील अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावरही आवश्यक कारवाई करण्यात येईल. त्यामुळे अशा प्रकारांना आळा बसण्यास मदत होईल, असे त्यांनी नमूद केले।
अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान या विषयावर सविस्तर चर्चा झाली. या चर्चेत आमदार शशिकांत शिंदे यांनीही सहभाग घेतला होता.
दरम्यान, आर्वी तालुक्यातील संबंधित प्रकरणाबाबत तक्रारींच्या अनुषंगाने चौकशी करण्यात आली असून कोणताही गैरप्रकार आढळला नसल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. मात्र, लोकप्रतिनिधींनी केलेल्या सूचनांची दखल घेत या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्यात येणार असून ती अतिरिक्त पोलिस अधीक्षकांमार्फत केली जाईल, अशी माहिती भोयर यांनी दिली.
या चौकशीत कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली।