विदर्भातील चार औष्णिक वीज केंद्रांना ड्रोन हल्ल्याच्या धमक्या; सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर
योगेश पांडे / वार्ताहर
विदर्भ : राज्यातील विविध ठिकाणी बॉम्बस्फोटांच्या धमक्यांच्या घटनांदरम्यान आता विदर्भातील चार प्रमुख औष्णिक वीज केंद्रांना ड्रोन हल्ल्याच्या धमक्या मिळाल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून सर्व संबंधित ठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, खापरखेडा, कोराडी, चंद्रपूर आणि पारस येथील औष्णिक वीज केंद्रांना लक्ष्य करण्याबाबत ईमेलद्वारे धमकी देण्यात आली. या ईमेलमध्ये ड्रोनच्या माध्यमातून सायनाइड किंवा प्राणघातक वायू असलेले बॉम्ब वापरण्याचा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र, आतापर्यंत कोणतीही संशयास्पद हालचाल आढळून आलेली नाही.
या धमकीनंतर पोलिस व सुरक्षा यंत्रणांनी तत्काळ हालचाल करत संबंधित वीज केंद्रांच्या परिसरात गस्त वाढवली आहे. खापरखेडा आणि कोराडी येथे बॉम्ब निकामी करणारी पथके, श्वान पथके तसेच जलद प्रतिसाद पथकांच्या मदतीने सुमारे पाच तासांची सर्च ऑपरेशन राबवण्यात आली. मात्र, या शोधमोहीमेत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही.
पोलीस उपआयुक्त संदीप पाखले यांनी सांगितले की, ही धमकी एका सामान्य ईमेल आयडीवरून पाठवण्यात आली असून पाठवणाऱ्याचा शोध सुरू आहे. प्राथमिक तपासात हा ईमेल तामिळनाडूमधून पाठवण्यात आल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तसेच आयपी ॲड्रेस लपवण्यासाठी तांत्रिक फसवणूक करण्यात आली आहे का, याचाही सायबर पोलिसांकडून तपास सुरू आहे.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर सर्व चार वीज केंद्रांच्या परिसरात ड्रोन उडवण्यावर निर्बंध घालण्यात आले असून सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. कोराडी वीज केंद्राचे वरिष्ठ सुरक्षा व्यवस्थापक देवेंद्र राठोड यांनी संपूर्ण परिसरात ‘हाय अलर्ट’ जाहीर करण्यात आल्याची माहिती दिली.