पॅकर्स अँड मुव्हर्सच्या नावाखाली घरफोडी करणारी टोळी अटकेत; सायन व काळाचौकी पोलिसांची संयुक्त कारवाई, ₹१२.२० लाखांचा मुद्देमाल हस्तगत!
सुधाकर नाडार / मुंबई
मुंबई – सायन आणि काळाचौकी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत पॅकर्स अँड मुव्हर्स कंपनीचे कर्मचारी असल्याचे भासवून घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. दोन्ही पोलिस ठाण्यांच्या संयुक्त तपासात पाच आरोपींना अटक करण्यात आली असून ₹१२ लाख २० हजार रुपयांचा सोन्या-चांदीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
१५ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ९ ते ११ वाजेदरम्यान सायन (पूर्व) येथील दोस्ती लाईट परिसरात आणि सायंकाळी ५.३० ते ६.३० या वेळेत माळी कुंज, मेघवाडी, लालबाग (काळाचौकी परिसर) येथे दोन वेगवेगळ्या घरफोडीच्या घटना घडल्या. आरोपींनी स्वतःला पॅकर्स अँड मुव्हर्स कंपनीचे कामगार असल्याचे भासवून घरातील सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले.
सायनमधील फिर्यादीकडून ₹८.८० लाखांचे दागिने, तर काळाचौकीतील फिर्यादीकडून ₹३.४० लाखांचे दागिने चोरीस गेले. याप्रकरणी सायन पोलीस ठाण्यात गु.र.क्र. ३५९/२०२५ कलम ३८०, ३४ भा.दं.सं. आणि काळाचौकी पोलीस ठाण्यात गु.र.क्र. ४०३/२०२५ कलम ३८०(अ) भा.दं.सं. अंतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले.
सायन व काळाचौकी पोलिसांनी स्वतंत्र तपास पथके स्थापन करून तांत्रिक तपास व गुप्त माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढला. सायन पोलिसांनी टोळीचा मुख्य सूत्रधार संदीप दिनेश विश्वकर्मा (२७) याला अटक करून ₹८ लाख किंमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले.
काळाचौकी पोलिसांनी कांदिवली परिसरातून चार आरोपींना ताब्यात घेतले.
१. प्रविण फुलचंद पांडे (२६)
२. दुर्गेश दिवाकांत मिश्रा (२६)
३. राकेश बळीराम यादव (२०)
४. पिंटू बबन सिंग (२८)
या संयुक्त कारवाईत १०० टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
ही कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री. देवेन भारती, मा. सहपोलीस आयुक्त (कावसु) श्री. सत्यनारायण, मा. अपर पोलीस आयुक्त (मध्य विभाग) श्री. विक्रम देशमाने, मा. उपपोलीस आयुक्त (परिमंडळ ४) सौ. रागसुधा आर., मा. सहायक पोलीस आयुक्त (भोईवाडा विभाग) श्री. घनश्याम पलंगे आणि मा. सहायक पोलीस आयुक्त (सायन विभाग) श्री. शैलेंद्र धिवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे (काळाचौकी) आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनंत साळुंखे (सायन) यांच्या नेतृत्वाखालील पथकांनी अत्यंत शिताफीने तपास पूर्ण केला.
सायन पोलिस पथकात पो.नि. संजय जगताप, पोउपनि. ठोंबरे, भोसले, शिवतरे, पो.ह. मोरे, जाधव, पो.शि. पाटील तसेच तांत्रिक मदतीसाठी पो.ह. गोविंदा ठोके यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
काळाचौकी पोलिस पथकात स.पो.नि. अमित भोसले, पो.शि. गोपाळ चव्हाण, पराग शिंदे, खांडेकर, विजय सोनवणे यांनी प्रभावी कामगिरी केली.
टोळीचा इतर संभाव्य गुन्ह्यांशी संबंध आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
सायन आणि काळाचौकी पोलिसांच्या या समन्वयित आणि जलद कारवाईचे वरिष्ठांकडून तसेच स्थानिक नागरिकांकडूनही कौतुक होत आहे.