परिमंडळ ४ पोलिसांची कारवाई; रात्री मोबाईल चोरी करणारा सराईत आरोपी अटकेत, ९ मोबाईल जप्त

Spread the love

परिमंडळ ४ पोलिसांची कारवाई; रात्री मोबाईल चोरी करणारा सराईत आरोपी अटकेत, ९ मोबाईल जप्त

सुधाकर नाडार / मुंबई

मुंबई : सार्वजनिक ठिकाणी रात्रीच्या वेळी मोबाईल चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला भोईवाडा पोलीस ठाणे हद्दीत पोलिसांनी शिताफीने अटक केली. आरोपीकडून एकूण नऊ मोबाईल फोन, अंदाजे एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी गुन्हा रजि. क्र. ०९/२०२६ अन्वये कलम ३०३(२) भा.न्या.सं. अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी हे केईएम रुग्णालय येथील डॉक्टर असून, ४ जानेवारी २०२६ रोजी रात्री १२.३० ते सकाळी ७ या वेळेत त्यांचा सॅमसंग ए-५४ मोबाईल अज्ञाताने चोरला होता.

तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील ४० ते ५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. तांत्रिक विश्लेषणातून फिरोज इस्माईल शेख (वय ४०) या सराईत गुन्हेगाराची ओळख पटली. तो मध्यरात्री हॉस्पिटल परिसरात येऊन मोबाईल चोरी करत असल्याची माहिती निष्पन्न झाली.

गुन्हे प्रकटीकरण पथकाने ८ ते १० दिवस सापळा रचला. १६ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे एकच्या सुमारास आरोपी चोरीच्या उद्देशाने आला असता त्याला ताब्यात घेण्यात आले. अंगझडतीत दोन मोबाईल जप्त करण्यात आले, तर पुढील तपासात आणखी सात मोबाईल हस्तगत झाले. अशा प्रकारे एकूण नऊ मोबाईल पोलिसांनी जप्त केले.

ही कारवाई मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ ४च्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon