चारित्र्याच्या संशयातून प्रेयसीकडून प्रियकराची हत्या; ‘डायल ११२’वर स्वतःच दिली माहिती

Spread the love

चारित्र्याच्या संशयातून प्रेयसीकडून प्रियकराची हत्या; ‘डायल ११२’वर स्वतःच दिली माहिती

पोलीस महानगर नेटवर्क

सातारा : चारित्र्याच्या संशयातून झालेल्या वादातून एका महिलेने आपल्या प्रियकराची कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना कराड शहरातील आगाशिवनगर परिसरात पहाटे उघडकीस आली. विशेष म्हणजे, हत्या केल्यानंतर संबंधित महिलेने स्वतःच ‘डायल ११२’वर फोन करून पोलिसांना घटनेची माहिती दिली. या घटनेमुळे सातारा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

आगाशिवनगर येथील श्रीराम कॉलनीमध्ये पहाटे ३.३१ वाजण्याच्या सुमारास कराड शहर पोलीस ठाण्याच्या बीट मार्शल पथकाला ‘डायल ११२’वरून एका महिलेचा मदतीसाठी फोन आला. फोनवरील आवाज घाबरलेला असल्याने पोलिसांनी तातडीने लोकेशन ट्रॅक करून घटनास्थळी धाव घेतली. तेथे घरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेला एका पुरुषाचा मृतदेह आणि हातात कुऱ्हाड घेऊन उभी असलेली महिला, असे दृश्य आढळून आले.

पोलिसांनी तात्काळ महिलेला ताब्यात घेतले. प्राथमिक तपासात संशयित महिलेचे नाव सारिका कोळी, तर मृत व्यक्तीचे नाव राजेंद्र मरीआप्पा काळे (रा. कराड) असल्याचे निष्पन्न झाले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला.

पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत सारिकाने गुन्ह्याची कबुली दिली आहे. राजेंद्र आणि तिच्यात काही काळापासून प्रेमसंबंध होते. मात्र, राजेंद्र तिच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने त्यांच्यात वारंवार वाद होत होते. घटनेच्या रात्रीही याच कारणावरून भांडण झाले. पहाटे पुन्हा वाद उफाळून आल्यानंतर राजेंद्रने मारहाण केल्याचा दावा सारिकाने केला आहे. त्यानंतर रागाच्या भरात तिने घरातील कुऱ्हाड उचलून राजेंद्रच्या मानेवर व चेहऱ्यावर वार केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

या प्रकरणात संशयित सारिकेला अटक करण्यात आली असून, तिच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी महिलेला एक लहान मुलगी असून, या घटनेमुळे तिच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कराड शहर पोलीस पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon