बीडच्या शिवाजी चौकात दिवसाढवळ्या राडा, तरुणांच्या दोन गटात तुंबळ हाणामारी

Spread the love

बीडच्या शिवाजी चौकात दिवसाढवळ्या राडा, तरुणांच्या दोन गटात तुंबळ हाणामारी

योगेश पांडे / वार्ताहर

बीड – शहरातील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकात रविवारी संध्याकाळी दोन तरुणांच्या गटांमध्ये झालेल्या राड्याने परिसरात काहीकाळ गोंधळ उडाला. गाडीला कट लागल्याच्या किरकोळ कारणावरून वाद पेटला आणि त्याचे रूप हाणामारीत बदलले. या घटनेत एक जण जखमी झाला असून पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजी चौकात दोन गटांतील काही तरुणांमध्ये गाडीला कट लागल्याच्या कारणावरून शाब्दिक वाद झाला. काही क्षणांतच वाद वाढत गेला आणि दोन्ही गटातील तरुणांनी एकमेकांवर हल्ला चढवला. या झटापटीत एक तरुण जखमी झाला असून त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोन्ही गटांतील तरुणांना ताब्यात घेतले मात्र परिसरात बराच वेळ तणाव होता. भांडणामुळे काही वेळासाठी चौकातील वाहतूकही विस्कळीत झाली होती.

या घटनेनंतर पोलिसांनी संबंधित दोन्ही गटांतील तरुणांविरोधात परस्परविरोधी तक्रारींवरून गुन्हे नोंदवले आहेत. शिवाजीनगर पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांनुसार दोन्ही गटांवर मारहाणीचा आणि सार्वजनिक शांततेचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी अशा प्रकारे राडा झाल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणातील सर्व तरुणांची चौकशी सुरू केली असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे घटनेचा अधिक तपास करण्यात येत आहे. पोलिसांनी नागरिकांना अफवा न पसरवण्याचे आणि शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon