एसटी बँकेच्या सभेत राडा! सदावर्ते गट आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी; वाद पोलीस ठाण्यात
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – एसटी बँकेच्या बैठकीमध्ये सदावर्ते गट आणि शिवसेना शिंदे गटाचे अडसूळ यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला आहे. या बैठकीच्या दरम्यान दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. यामध्ये चार ते पाच संचालक जखमी झाल्याची माहिती आहे. या दोन्ही गटाचा वाद आता नागपाडा पोलीस ठाण्यात पोहोचला असून एकमेकांविरोधात तक्रारी देण्यात आल्या आहेत.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटी बँकेची मिटिंग बोलवण्यात आली होती. त्यामध्ये दिवाळी बोनस वाटपाची चर्चा करण्यात आली. याच मुद्द्यावरून सदावर्ते गट आणि अडसूळ गट यांच्यामध्ये मतभेद झाले आणि नंतर त्याचे रुपांतर हाणामारीमध्ये झालं. एसटी बँकेच्या संचालकांच्या बैठकीमध्ये बाहेरुन आलेली माणसे बसवण्यात आल्याचा आरोप अडसूळ गटाकडून करण्यात आले आहे.
एसटी बँकेमधील सदावर्ते गट आणि शिवसेनेचा अडसूळ गट यांचा वाद विकोपाला गेलं.सदावर्ते गटाकडून या बँकेमध्ये मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप अडसूळ गटाकडून करण्यात येत आहे. त्यातूनच बुधवारचा राडा झाल्याचं दिसतंय.या बाबतीत माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की, “या बँकेमध्ये सदावर्तेंनी जो भ्रष्टाचार, गैरव्यवहार केला त्यामुळे कर्मचाऱ्यांना ही बँक सुरक्षित वाटत नाही. या बँकेत १२५ कर्मचाऱ्यांची भरती ही पैसे घेऊन करण्यात आली आहे. या बँकेच्या १२ कोटीच्या सॉफ्टवेअरसाठी सदावर्तेंच्या गटाने ५२ कोटी दिले आहेत. या सगळ्या गोष्टी आता समोर येत असल्याने त्यांचे पित्त खवळले. त्यामुळेच सदावर्तेंनी बाहेरची माणसे बैठकीत आणले आणि त्यांनी हा राडा घातला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये या सगळ्या गोष्टी दिसत आहेत. या प्रकरणी आम्ही नागपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.”
एसटी बँकेच्या मिटिंगमध्ये बाहेरून लोक आणले होते आणि संचालकांच्या सोबत बसले होते असा आरोप अडसूळ गटाने केला आहे. तशा प्रकारची तक्रार देण्यात आली आहे.
या आगोदर एसटी बँकेच्या इतिहासामध्ये अशा प्रकारची हाणामारीची घटना घडली नाही. एसटी को-ऑपरेटिव्ह बँक ही एसटी कर्मचाऱ्यांच्या घामाच्या पैशावर चालणारी आशिया खंडातील सगळ्यात मोठी को-ऑपरेटिव्ह बँक म्हणून ओळखली जाते. परंतु गेल्या काही दिवसात या बँकेमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळेच या बँकेतून मोठ्या प्रमाणात ठेवीही काढण्यात येत असल्याची माहिती आहे.