एकीकडे सोनं सव्वा लाखांवर; दुसरीकडे कमी दरात सोन्याचं अमिष दाखवून महिलेस १ कोटी १२ लाखांना गंडा

Spread the love

एकीकडे सोनं सव्वा लाखांवर; दुसरीकडे कमी दरात सोन्याचं अमिष दाखवून महिलेस १ कोटी १२ लाखांना गंडा

योगेश पांडे / वार्ताहर 

अकोला – सोन्याचा दर दररोज नव्याने उच्चांक आणि दरवाढीचा विक्रम गाठत असून गेल्या वर्षभरात सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. सोन्याने १ लाख रुपयांचा टप्पा कधीच पार केला असून सध्या सोन्याचे दर सव्वा लाख रुपये प्रति तोळाच्या घरात आहेत. त्यामुळे, सोनं आता अधिकच मौल्यवान दागिना बनलं आहे. त्यातून, सोन्याची चोरी, फसवणूक, चैन स्नॅचिंगच्या घटना वाढत आहेत. अकोल्यातून अशीच कमी भावाने सोनं खरेदीचे अमिष दाखवून एका महिलेला तब्बल १ कोटी ११ लाख रुपयांना गंडा घातल्याचे समोर आलं आहे. याप्रकरणी, पोलिसांनी चौघांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

एकीकडं सोन्याची किमती मोठी झेप घेत असताना, दुसरीकडे दिवाळीच्या मुहूर्तांवर सोने खरेदीसाठी बाजारपेठा फुलल्या आहेत, विक्रमी दरवाढ झाल्यानंतरही ग्राहकांचीही सोनं खरेदीसाठी गर्दी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, अकोल्यात कमी भावात सोनं देण्याचं आमिष दाखवत एका महिलेची फसवणूक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. त्यामध्ये, तब्बल १ कोटी ११ लाख १२ हजार रुपयांना महिलेला गंडविण्यात आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी अमोल नेरकर, मनोहर नेरकर, प्रेम हरिनारायण गावंडे आणि नीतेश महल्ले या चार आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून दागिनेही जप्त करण्यात आले आहेत.

कमी दरात सोन्याचे दागिने देत असल्याचे आमिष दाखवत या महिलेकडून सव्वा कोटींच्या जवळपास रुपये घेण्यात आले. मात्र, संबंधित महिलेला आरोपींनी नकली सोन दिलं. सुरुवातीला महिलेचा विश्वास संपादन करण्यासाठी तिला कमी दरात खरं, असली सोनं देण्यात आलंय. मात्र, विश्वास संपादन केल्यानंतर नकली सोनं देण्यात आलं. या प्रकरणी, आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच महिलेनं शहरातील पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर, याप्रकरणी रामदासपेठ पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून ५१४.७२० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. ज्याची किंमत सुमारे ६१ लाख ७६ हजार रुपये इतकी आहे. दरम्यान, आरोपींनी महिलेकडून मिळालेल्या पैशातून असली, खरं सोने घेऊन ते अकोला, तेल्हारा, नांदुरा, खामगाव आणि बुलढाणा येथील ज्वेलर्सकडे गहाण ठेवले होते. त्यानुसार, आता पोलिसांकडून उर्वरित दागिने जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon