दिवसा घरफोडी करणारा सराईत चोर अटकेत; ४८ गुन्ह्यांची उकल, १.३९ कोटींचे सोन्याचे दागिने जप्त
सुधाकर नाडार / मुंबई

ठाणे : दिवसा बंद घरांवर लक्ष ठेवून घरफोडी करणाऱ्या सराईत चोराला ठाणे गुन्हे शाखा घटक-१ च्या पथकाने अटक केली असून त्याच्याकडून ४८ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपीकडून सुमारे १ कोटी ३९ लाख रुपये किमतीचे १.०३ किलो वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मागील दोन-तीन वर्षांपासून दिवा पूर्व आणि मुंब्रा परिसरात बंद घरांचे बाथरूम व खिडक्यांच्या लोखंडी ग्रिल उचकटून तसेच मुख्य दरवाज्याचे कडी-कोयंडे तोडून घरफोडी होत असल्याच्या अनेक तक्रारी मुंब्रा पोलीस ठाण्यात दाखल झाल्या होत्या. या मालिकेतील घरफोड्यांचा तपास गुन्हे शाखा घटक-१ कडून सुरू होता.
तपासादरम्यान घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण करून पोलिसांनी संशयिताची ओळख पटवली. आरोपी ओळख लपवण्यासाठी प्रवास करताना विविध मार्गांचा वापर करत असल्याचेही तपासात समोर आले. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने पोलिसांनी शिवाजी गोपाळ संते (वय ३१) याला २ मार्च २०२६ रोजी टिटवाळा पूर्व येथून अटक केली.
चौकशीदरम्यान आरोपीने मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील काही वर्षांत ४८ घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीस गेलेले १.०३ किलो वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.
तपासात आरोपी बंद घरांवर लक्ष ठेवून बाथरूम किंवा खिडक्यांच्या लोखंडी ग्रिल तसेच मुख्य दरवाज्याचे कडी-कोयंडे लोखंडी रॉडच्या साहाय्याने उचकटून घरफोडी करत असल्याचे उघड झाले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. पंजाबराव उगले, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) अमरसिंह जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त (शोध-१) शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक दीपक घुगे, दीपक जाधव, सहायक पोलीस उपनिरीक्षक सुनील माने तसेच पथकातील इतर कर्मचाऱ्यांनी पार पाडली.