जळगावमध्ये पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या; मूळ गावी राहत्या घरात उचलले टोकाचे पाऊल

Spread the love

जळगावमध्ये पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या; मूळ गावी राहत्या घरात उचलले टोकाचे पाऊल

पोलीस महानगर नेटवर्क

जळगाव : जळगाव येथील एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या मूळ गावी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. निलेश माधवराव पाटील (रा. कोदगाव, ता. चाळीसगाव) असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून या घटनेमुळे पोलीस वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निलेश पाटील हे आपल्या चुलत आजोबांच्या तेराव्या कार्यक्रमासाठी मूळ गावी कोदगाव येथे आले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर ते रात्री गावातील राहत्या घरी थांबले होते. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचा मोबाईल बंद लागत असल्याने कुटुंबीयांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु संपर्क होऊ शकला नाही.

यानंतर कुटुंबीयांनी गावातच राहणारे त्यांचे चुलत भाऊ सुनील पाटील यांना घरी जाऊन पाहण्यास सांगितले. सुनील पाटील हे संबंधित घराजवळ पोहोचून त्यांनी दरवाजा ठोठावला आणि आवाज दिला, मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. संशय आल्याने त्यांनी घराच्या खिडकीतून आत डोकावून पाहिले असता निलेश पाटील यांनी आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह ताब्यात घेतला. पुढील वैद्यकीय प्रक्रिया व शवविच्छेदनासाठी मृतदेह चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

दरम्यान, एका तरुण पोलीस कर्मचाऱ्याने असे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून या घटनेमुळे चाळीसगाव तालुका परिसरासह पोलीस वर्तुळात शोककळा पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon