जीवघेणी वाहतूक कोंडी, ७० किलोमीटरसाठी १२ तास; मुंबईतील नामांकित शाळेतील शेकडो विद्यार्थी कोंडीत
योगेश पांडे / वार्ताहर
ठाणे – मुंबई आणि उपनगरातील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस जीवघेणी ठरत आहे. मुंबईतील दोन शाळांमधील विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका सहन करावा लागला. मुंबईतील दादर परिसरातील एका नामांकित शाळेतील विद्यार्थी (सहा बस) आणि मालवणी भागातील विद्यार्थी (सहा बस) तब्बल १२ तास अन्न-पाण्याविना वाहतूक कोंडीत अडकले. दादरमधील नामांकित शाळेतील विद्यार्थी वज्रेश्वरी येथील द ग्रेट एस्केप वॉटर पार्कमध्ये पिकनिकसाठी गेले होते.
दादर ते द ग्रेट एस्केप वॉटर पार्क यामध्ये ७० किलोमीटरचं अंतर आहे. याशिवाय या प्रवासासाठी अडीच ते तीन तास लागतात. मात्र सायंकाळी ४.३० वाजता वॉटर पार्कमधून निघाल्यानंतर त्यांना घरी पोहोचायला दुसऱ्या दिवसाची पहाट उजाडली. ही मुलं बुधवारी सकाळी ६ वाजता दादरला पोहोचले. या जीवघेण्या वाहतूक कोंडीमुळे संताप व्यक्त केला जात आहे.
ठाणे घोडबंदर महामार्गाच्या दुरुस्तीसाठी अवजड वाहनांना घातलेल्या बंदीचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे. संध्याकाळी पाच वाजल्यापासून विद्यार्थी वाहतूक कोंडीत अडकले होते. ढिसाळ वाहतूक नियोजनामुळे विद्यार्थ्यांच्या १२ बस वाहतूक कोंडीत अडकल्या. वाहतूक व्यवस्था कोलमडलेली असताना वाहतूक पोलीस मात्र गायब होते. त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र काहीच प्रत्युत्तर नसल्याची माहिती आहे. रात्रभर विद्यार्थी पाणी-अन्नाविना बसमध्ये बसून होते. संपूर्ण रात्र त्यांनी बसमध्ये बसून घालवली.
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी संध्याकाळी प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली. या कोंडीत शाळकरी विद्यार्थ्यांच्या तब्बल १२ बस अडकून पडल्या. संध्याकाळी पाच वाजल्यापासून सुरू झालेल्या या गोंधळात तहान-भुकेने शेकडो विद्यार्थी व्याकूळ झाले. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. विशेष म्हणजे, संपूर्ण वाहतूक व्यवस्था कोलमडलेली असतानाही एमबीव्हीव्ही चे वाहतूक पोलीस घटनास्थळी दिसले नाहीत. ठाणे-घोडबंदर महामार्गावरील दुरुस्ती कामांसाठी अवजड वाहनांना घातलेल्या बंदीचा फटका अखेर सामान्य नागरिक आणि विद्यार्थ्यांना बसला. सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष सुशांत पाटील यांनी याबाबतची माहिती मिळताच त्यांच्या सहकाऱ्यांसह बसपर्यंत पोचून विद्यार्थ्यांना पाणी आणि खाण्यासाठी बिस्किट उपलब्ध करून दिले. तसेच वाहतूक कोंडीतून बस बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले.