मतदारयाद्यांमधील त्रुटींवरून राज्यातील विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार; राज ठाकरे यांची मतदारयाद्या मिळेपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – राज्य निवडणूक आयोगासोबत बुधवारी दुसऱ्या दिवशी विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांची बैठक झाली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारयाद्यांबाबत असलेल्या तक्रारींवरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह इतर नेत्यांनी राज्य निवडणूक आयुक्तांसोबत काल बैठक घेत आपले मुद्दे मांडले. त्यानंतर बुधवारी शरद पवार वगळता बाकीच्या नेत्यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयुक्तांकडे जात आपल्या तक्रारी नोंदवल्या. या बैठकीत ठाकरे बंधूंनी आक्रमकपणे आपले मुद्दे मांडल्याची माहिती समोर आली आहे. मतदारयाद्यांबाबत तक्रारी असल्याने लगेच निवडणुका घेऊ नका, अशी मागणी राज ठाकरेंनी या बैठकीत केली आहे. तर VVPAT घेत नाही, म्हणजे सर्व पुरावे तुम्ही नष्ट कराल, असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केल्याचे समजते.
बैठकीत आपले मुद्दे मांडताना राज ठाकरे म्हणाले की, “निवडणुका राजकीय पक्ष लढवतात. मग राजकीय पक्षांना शेवटची मतदार यादी दाखवत का नाही? मतदार नोंदणी बंद करून लपवाछपवी कशासाठी? सर्व राजकीय पक्षांचं एकमत होत नाही तोपर्यंत निवडणूक घेऊ नका. सत्तेतील तीन पक्षांसाठी तुम्ही काम करत नाही,” अशा शब्दांत राज ठाकरेंनी आयोगाच्या अधिकाऱ्यांना सुनावलं. तसंच आमचं तुमचं करू नका, आमच्यासाठी निवडणूक आयोग एकच, असंही राज ठाकरे यावेळी म्हणाल्याची माहिती आहे.
दरम्यान, ” बाळासाहेब थोरात ८ टर्म ८०-९० हजार मतांच्या फरकाने निवडणूक जिंकतात आणि यंदा लाखाने पडले, हे कसं शक्य आहे?” असा सवाल या बैठकीत राज ठाकरेंनी उपस्थित केला. त्यावर निवडणूक आयोगाचे दोन्ही अधिकार निरुत्तर झाल्याचे पाहायला मिळाले. “मतदार याद्या आम्हाला द्या, आम्हीही शहानिशा करू. मतदार यादीत घोळ असेल तर तुम्ही सुप्रीम कोर्टाला सांगा, आम्ही तयार नाही ते आणि निवडणूक पुढे ढकला,” असंही राज ठाकरे यांनी यावेळी म्हटलं.
मतदारयाद्यांविषयीच्या संभ्रमावर बोलताना राज्य निवडणूक आयोगासोबतच्या बैठकीत उद्धव ठाकरेही आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. “चोक्कलिंगम म्हणतात काही जबाबदारी आमच्याकडे नाही, राज्य निवडणूक आयोग म्हणतं आमच्याकडे नाही, मग आम्ही कुणाशी बोलू? त्रुटीसह जर निवडणुका घ्यायच्या असेल तर निवडणुका कशाला घेता? ड्रायरेक्ट election for selection करून टाका,” अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी आपला संताप व्यक्त केला.