मुंब्र्यात ‘मेंदी जिहाद’ला चपराक, हिंदू-मुस्लीम महिलांनी एकत्र येत जपला सामाजिक सलोखा
योगेश पांडे / वार्ताहर
ठाणे – मागील काही दिवसांपासून ‘मेंदी जिहाद’ यावरून हिंदू आणि मुस्लिम समुदायातील महिलांमध्ये तणावाचे वातावरण दिसून येत आहे. हिंदू संघटनांकडून हिंदू महिलांना आवाहन केले जात होते की, त्यांनी मुस्लिम महिलांकडून मेंदी काढून घेऊ नये. मात्र, ठाण्यातील मुंब्रा परिसरात या ‘मेंदी जिहाद’ला अत्यंत सकारात्मक पद्धतीने प्रतिउत्तर देण्यात आले आहे.
मुंब्रा येथील मर्जीया शानू पठाण यांच्या पुढाकाराने दिवाळी सणानिमित्त एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात हिंदू आणि मुस्लीम महिला एकत्र आल्या. मुस्लीम महिलांनी हिंदू महिलांना त्यांच्या हातावर मेंदी काढून दिली, तर हिंदू महिलांनी त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. या कृतीतून त्यांनी सामाजिक सलोखा आणि एकतेचा अत्यंत महत्त्वाचा संदेश दिला आहे.
मेंदी हा केवळ एक सौंदर्यप्रसाधनाचा भाग नसून, तो सण-समारंभाचा आणि आनंदाचा अविभाज्य घटक आहे. त्याला कोणत्याही विद्वेषाच्या नावाखाली धर्माच्या चौकटीत अडकवणे चुकीचे आहे, हे या महिलांनी कृतीतून दाखवून दिले.
मुंब्रासारख्या संवेदनशील मानल्या जाणाऱ्या ठिकाणी हिंदू आणि मुस्लिम महिलांनी एकत्र येऊन सण साजरा करण्याची ही कृती प्रशंसनीय आहे. या महिलांनी दाखवून दिले की, विविधतेत एकता हीच भारताची खरी ओळख आहे. सण आणि उत्सव हे दोन समुदायांना जवळ आणण्याचे आणि त्यांच्यातील प्रेम वाढवण्याचे माध्यम आहेत. महिलांना आपल्या कृतीतून ‘मेंदी जिहाद’ या संकल्पनेला पुरेपूर उत्तर दिले आहे.